। डोंबिवली । प्रतिनिधी ।
डोंबिवली येथील पलावा ऑलिम्पिक स्पोर्ट सेंटरमध्ये झालेल्या दुसर्या आरवायपी राष्ट्रीय मानांकन पिकलबॉल स्पर्धेत जळगावच्या स्नेहल पाटीलने जोरदार कामगिरी करत तब्बल 6 सुवर्णपदक पटकावले आहेत. विशेष म्हणजे तिला स्पर्धेतील सर्वोत्तम एमव्हीपीचा पुरस्कार मिळाला आहे. पुढच्या वर्षी थायलंडमध्ये होणार्या आशियाई ओपन स्पर्धेत ती आता भारताचे नेतृत्वही करणार आहे.
डोंबिवलीतल्या पलावा ऑलिम्पिक स्पोर्टमध्ये सुरू असलेल्या आरवायपी राष्ट्रीय मानांकन पिकलबॉल स्पर्धेसाठी 20 राज्यातील 300 पेक्षा जास्त खेळाडूंनी हजेरी लावली होती. स्पर्धेत पुरुष एकेरीत झारखंडच्या सोनुकुमारने सुवर्णपदक जिंकले. त्याने महाराष्ट्राच्या तेजस महाजनचा पराभव केला. पुरुष दुहेरीत गौरव राणे आणि कश्यप बरनवाल जोडीने सुवर्णपदक जिंकले. त्यांनी अनिकेत आणि प्रणवला नमवले. महिला दुहेरीत स्नेहल आणि वृषालीने अनन्या-द्रिशीका जोडीला धूळ चारली. मिश्र दुहेरीतही स्नेहल-कुलदीपने अजय-वृषालीचा पराभव केला.
दुसर्या आरवायपी राष्ट्रीय मानांकन पिकलबॉल स्पर्धेत स्नेहलने महिला एकेरी, महिला दुहेरी, मिश्र दुहेरी, 19 वर्षांखालील मुलींची एकेरी, 19 वर्षांखालील मुलींची दुहेरी, 19 वर्षांखालील मिश्र दुहेरी अशा 6 विभागात सुवर्णपदकांची अक्षरशः लयलूट केली आहे. विशेष म्हणजे स्पर्धेतला सर्वोत्तम एमव्हीपीचा पुरस्कारही तिने मिळवला आहे. आता पुढच्या वर्षी थायलंडमध्ये होणार्या आशियाई ओपन स्पर्धेत ती भारताचे नेतृत्वही करणार आहे. तिच्या या तडाखेबाज कामगिरीने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.