म्हसळा येथे अनिल नवगणे यांच्या प्रचारार्थ सभा
| बोर्ली पंचतन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथील आंतरराष्ट्रीय बंदरासाठी स्थानिक शेतकर्यांच्या हजारो एकर जमिनी संपादित करण्यात आल्या; परंतु त्यामध्ये स्थानिकांना रोजगार नाही. जर स्थानिक तरुणांना रोजगार मिळणार नसेल, तर दिघी पोर्टच्या कामाला आम्ही हात लावू देणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी शनिवारी (दि. 16) म्हसळा येथे झालेल्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल नवगणे यांच्या प्रचार सभेत दिला.
आज अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. शेतकर्यांच्या शेतीमालाचा, त्यांच्या आत्महत्येचा प्रश्न, महिलांवरील अत्याचार, बेरोजगारी अशा अनेक प्रश्नांच्या मालिका आ वासून उभ्या आहेत. कोरोना काळात या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रं उद्धव ठाकरे यांच्याकडे होती, त्यावेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक चांगलं शासन देण्याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु, पुढील अडीच वर्षांच्या काळात जे काही राजकारण झालं, ते जनतेने अनुभवलं. पुढची अडीच वर्षे यांच्याकडे सत्ता होती, त्यावेळी त्यांना लाडक्या बहिणी आठवल्या नाहीत; परंतु लोकसभेला महाराष्ट्रातील जनतेने 30 ठिकाणी त्यांचा पराभव केल्यानंतर त्यांना लाडक्या बहिणींची आठवण झाली. आज महाराष्ट्रमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. राज्यामध्ये 64 हजार महिला बेपत्ता आहेत. अशी परिस्थिती महाराष्ट्रात कधीही नव्हती. आज या भगिनींना कोण कुठे घेऊन गेलं? त्याचा शोध लागत नाही. जे भगिनींचं संरक्षण करू शकत नाही, त्यांना राज्य चालवण्याचा अधिकार नाही, असे पवार म्हणाले.
आज खर्या अर्थाने तुमची बांधिलकी स्थानिक जनतेशी होती. जोपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत विकास पोहोचत नाही,त्यांच्या प्रश्नांची पूर्तता होत नाही तोपर्यंत विकासाच्या नावावर मते मागण्याचा तुम्हाला अधिकार नाही. म्हणून येथील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अनिल नवगणे यांना निवडून देण्याचं आवाहन शरद पवार यांनी केलं. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल नवगणे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितलं की या वेळेला श्रीवर्धन मतदारसंघ भ्रष्टाचारमुक्त झाला पाहिजे. यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हायला पाहिजे. आजपर्यंत आपल्या सोयीने आणि आपल्या स्वार्थासाठी राजकारण करण्यातच त्यांनी आयुष्य घालवलं. आपले राजकीय गुरू म्हणून बॅ. अंतुले यांचा उल्लेख वारंवार करणारे सुनील तटकरे यांनी त्यांच्या शेवटच्या काळात त्यांच्यावर जे आरोप आणि टीका टिप्पणी केली, त्यावेळी बॅ.अंतुले यांना जाणीव झाली की आपण यांना पुढे आणून फार मोठं पाप केलं. ज्या शरद पवारांनी त्यांना हवं ते दिलं तरीसुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी त्यांना सोडून दिलं. आज या मतदारसंघामध्ये कितीतरी दिग्गज असताना त्यांनी केवळ स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांनाच उमेदवारी दिली, बाकी कोणत्याही समाजाचा त्यांनी विचार केला नाही.आज शरद पवारांना त्यांनी सोडलं उद्या अजित पवारांसोबत राहतील की नाही हे सांगू शकत नाही म्हणून माझं येथील जनतेला सांगणं आहे की अशा लोकांपासून सावध राहा. आज ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात फिरायला पाहिजे होतं परंतु ते श्रीवर्धन मतदारसंघात अडकून पडले आहेत. तुम्ही जर स्वतःला विकासपुरुष समजत असाल, तर तुम्हाला आज गाव गाव, वाडी, वस्ती, गल्लीत फिरण्याची वेळ का आली, असा सवाल नवगणे यांनी केला.
आज या मतदारसंघात हजारो कोटी रुपये पाण्याच्या योजनेसाठी आले आहेत; परंतु 90 टक्के योजना अजूनही बंद आहेत.गावच्या लोकांना विश्वासात न घेता स्वतःचा ठेकेदार पाठवायचा, पाईप टाकायचे काम पूर्ण करायचे नाही आणि कामाचे 80-90 टक्के पैसे काढून घ्यायचे, हा यांचा कार्यक्रम, असा घणाघात अनिल नवगणे यांनी केला. श्रीवर्धन मतदारसंघातील 80 टक्के लोकं रोजगारासाठी शहराकडे जातात. एखाद्या खेडेगावात प्रचारासाठी गेलो तर तेथे वयोवृध्द माणसं आपल्याला भेटतात. सर्व तरुण वर्ग आज मुंबईमध्ये रोजगारासाठी आहे. ते श्रीवर्धन मतदारसंघामध्ये रोजगार तयार करू शकले नाहीत. मी आज तुम्हाला सांगू इच्छितो जर मला संधी दिली तर येथील रोजगाराच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेन. आपल्या विभागात सुसज्ज अशी रुग्णालयाची व्यवस्था नाही, काही मोठे शासकीय दवाखाने आहेत; परंतु तेथे कर्मचारी नाहीत. दिघी पोर्टच्या अनुषंगाने अदानी समूहाकडून या विभागात बांधण्यात येणारे मोठं रुग्णालय तटकरे यांनी रोह्यात नेलं. पोर्टसाठी जमीन जाते श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड तालुक्यातील; परंतु येथील जनतेच्या आरोग्यासाठी हक्काचं असणारं रुग्णालय रोह्यात? हे रुग्णालय मी आपल्या विभागात आणण्यासाठी नक्कीच पुढाकार घेईन.
राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे, त्यामुळे इथला आमदारसुद्धा महाविकास आघाडीचा असला पाहिजे. यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, असं आवाहन नवगणे यांनी जनतेला केलं. श्रीवर्धन विधानसभा काँग्रेस अध्यक्ष विजय तोडणकर त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटात नुकताच प्रवेश केलेले शामकांत भोकरे यांनीसुध्दा आपलं मनोगत व्यक्त केलं. याप्रसंगी माजी आमदार तुकाराम सुर्वे, मुस्लिम समाजाचे नेते श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण व अनमोल जीवन सामाजिक ट्रस्ट यांच्याकडून अनिल नवगणे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला.
काहींनी कुटुंबाचाच विकास केला
काही लोकांना आम्ही संधी दिली, सत्ता दिली, पाठिंबा दिला जेणेकरून लोकांचे प्रश्न सोडवता येतील, विकास करता येईल. त्यासाठी राज्यात मंत्री बनवलं, अन्य ठिकाणी संधी दिली; परंतु त्यांनी रायगड जिल्ह्याच्या विकासाऐवजी आपल्या कुटुंबाचा म्हणजेच स्वतःचा, मुलीचा, मुलाचा, भावाचा विकास केला, असा टोला शरद पवार यांनी तटकरे यांना नाव न घेता लगावला.