…म्हणून तृतीयपंथीयाने घेतला चिमुकलीचा जीव

मुंबई | प्रतिनिधी |

मुलगी होऊन तीन महिने झाले. आम्हाला साडी, पैसे आणि नारळ असे बक्षीस द्या अशी मागणी केली असता पालकांनी देण्यास नकार देऊन अपशब्द वापरले. यामुळे चिडलेल्या एका तृतीयपंथीयाने तरुणाला हाताशी घेऊन रात्रीच्या वेळेस झोपेत असलेल्या तीन महिन्यांच्या चिमुकलीचे तिच्या घरातून अपहरण केले आणि तिला खाडीत टाकून ठार मारल्याची संतापजनक घटना कफ परेड येथे घडली. याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी तत्काळ तपास हाती घेऊन दोन्ही आरोपींना अटक केली.

कफ परेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विठ्ठलवाडीत सचिन हे त्यांची पत्नी व आईवडिलांसोबत राहतात. त्यांना तीन महिन्यांची मुलगी होती. गुरुवारी रात्री सचिन व त्यांचे कुटुंबीय घरात झोपलेले असताना मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास अज्ञात इसमांनी मोठय़ा शिताफीने त्या चिमुकलीचे घरातून अपहरण केले. काही वेळानंतर मुलगी जवळ नसल्याचे लक्षात येताच सचिन यांनी आजूबाजूला शोधाशोध केली, पण ती कुठे मिळून आली नाही. त्यामुळे सचिन यांनी कफ परेड पोलीस ठाण्यात जाऊन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. दरम्यान, मुलीचा सर्वत्र शोध सुरू असताना तेथे असलेल्या समुद्राच्या खाडीत त्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला आणि कफ परेड परिसरात खळबळ उडाली. वरिष्ठ निरीक्षक राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपास सुरू केला.

नाही म्हटले, वाद घातला म्हणून

तेव्हा त्याच परिसरात राहणारा कन्हैया चौगुले (24) हा तृतीयपंथीय मुलगी झाली त्यानिमित्ताने आम्हाला साडी, नारळ आणि पैसे द्या अशी मागणी करीत होता, पण आम्ही त्याला ते देण्यास नकार दिला होता. तेव्हा आमच्यात थोडी बाचाबाची झाली होती असे मुलीच्या पालकांनी सांगताच हाच दोरा पकडून पोलिसांनी कन्हैया चौगुले आणि त्याचा साथीदार सोनू काळे (20) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्हा घडल्यापासून 12 तासांच्या आत पोलिसांनी तीन महिन्यांच्या चिमुकलीचा नाहक बळी घेणाऱया दोघा आरोपींनी गजाआड केले.

Exit mobile version