| उरण | दिनेश पवार |
उरण परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षिका सौ. संगिता सचिन ढेरे यांनी महिला सक्षमीकरण, आरोग्य जनजागृती आणि शिक्षण प्रसार या क्षेत्रांत सातत्यपूर्ण व प्रभावी कार्य करत समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यांचे शिक्षण एम .ए. बी. एड.आहे. हिरकणी वृत्तपत्राच्या कार्यकारी संपादक देखील आहेत. समाजकार्य करून पहिली ते दहावी विद्यार्थ्यांचे क्लासेस देखील घेतात. महिला सक्षमीकरण होण्यासाठी यांची नेहमीच धडपड राहते महिलांना रोजगार व स्वयंरोजगार कसा मिळेल याची कार्यशाळा घेऊन त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा पाठपुरावा करतात. महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था, उरण यांच्या
माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविणे, बचत गटांना मार्गदर्शन करणे, आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणे, तसेच मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवत आहेत. विशेषतः ग्रामीण व गरजू घटकांपर्यंत पोहोचून त्यांनी केलेले काम उल्लेखनीय मानले जाते. त्यांच्या या सातत्यपूर्ण सामाजिक योगदानाची दखल विविध स्तरांवर घेण्यात आली असून त्यांना शासनाचा मानाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय रायगड भूषण, महाराष्ट्र भूषण यांसह एकूण 17 विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. सौ. संगीता सचिन ढेरे यांच्या कार्यामुळे परिसरातील अनेक महिलांना आत्मविश्वास मिळाला असून स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळत आहे. शब्दांकन – दिनेश पवार







