। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील बारशेत येथील सुरेश लक्ष्मण खेराडे यांनी त्यांच्या मालकीची जागा गावाकीला दिली नाही म्हणून, त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांवर गावकीने दोन वर्षापासून सामाजिक बहिष्कार टाकला. या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गावच्या ग्रामस्थ कमिटीमधील आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश लक्ष्मण खेराडे रोहा तालुक्यातील बारशेत गावात कुटुंबासह राहतात. बारशेत गावठाणामध्ये त्यांचे स्वत: चे घर आहे. या गावात त्यांची कागदोपत्री मालकीची जमीन आहे. मात्र, गावातील लोक या जमिनीवर दावा सांगत आहेत. ही जमीन देण्यास सुरेश खराडे यांनी नकार दिला. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून बारशेत गावकीने त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला आहे. सुमारे 80 वर्षांपूर्वी गावच्या खोताने गावकीची म्हणून विश्वासाने सुरेश खेराडे यांच्या आजोबांच्या नावे जमीन केली होती. गावाने आपल्याशी बोलावं, आमच्याशी नीट राहावं म्हणून यापूर्वीच गावाच्या दबावात सुरेश यांनी 15 हून अधिक एकर जमीन गावाच्या नावावर केली आहे. अजूनही त्यांची 15 हून अधिक एकर जमीन नावावर करण्यास दबाव टाकला जात आहे. त्यास रमेश खेराडे यांनी विरोध दर्शविला. त्यामुळे दोन वर्षापासून सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला आहे.