नवरात्र उत्सव मंडळ रांजणखारची सामाजिक बांधिलकी

बहिरीचापाडा येथे पाणपोईचे लोकार्पण
। चौल । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्‍या नवरात्र उत्सव रांजणखार नाका मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत बहिरीचा पाडा येथे पाणपोई उभारली आहे. या पाणपोईचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. रक्तदान, श्रमदान आणि सामाजिक कार्यात योगदान देणार्‍या या मंडळाने जलदान करुन आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे.
नवरात्र उत्सव मंडळ रांजणखार नाका यांच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे आजतागायत करण्यात आली आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, पेढांबे प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविलेले स्वच्छता अभियान असो, परिसरातील भुवनेश्‍वर मंदिर तसेच अन्य मंदिरांतील साफसफाई, तसेच महाड पूरग्रस्तांच्या घरांची केलेली स्वच्छता असो, वा रक्तदान शिबीर असो. अशा प्रत्येक कार्यात मोलाचा हातभार या मंडळाने लावून समाजाप्रती आपली असलेली नाळ अधिक वृद्धिंगत केली आहे. याच कार्याचा एक भाग म्हणून बहिरीचा पाडा येथे नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे म्हणून येथील मराठी शाळेच्या बाजूला पाणपोई उभारली आहे. तिचा लोकार्पण सोहळा हनुमान जयंतीच्या दिवशी पार पडला. रक्तदान, श्रमदान आणि सामाजिक कामाबरोबरच जलदानाचे कार्यदेखील करण्यात आले आहे. या पाणपोईमुळे मराठी शाळेतील मुले, एसटीला ये-जा करणारे प्रवासी आणि ग्रामस्थांना चांगला लाभ होईल, असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

Exit mobile version