टाटा स्टील बीएसएलची सामाजिक बांधिलकी

कोविड-19 विरोधातील उपाययोजनांना मदत
5 व्हेंटिलेटर्स व 5 बायपॅप मशीन्स स्थानिक प्रशासनाला भेट
रुग्णांच्या उपचारांसाठी पुरवला जात आहे वैद्यकीय श्रेणीचा ऑक्सिजन
पनवेल | वार्ताहर |

टाटा स्टील बीएसएलचे खोपोली(रायगड) युनिट सध्याच्या कोविड-19 विरोधातील लढाईत योगदान देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. श्‍वास घेण्यात त्रास होत असलेल्या कोविड-19 रुग्णांवरील उपचारांसाठी वापरण्यात येणार्‍या 5 बायपॅप मशीन्स नुकत्याच टाटा स्टील बीएसएलच्या खोपोली प्लांटचे कार्यकारी प्रमुख कपिल मोदी यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी व दंडाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे त्यांच्या कार्यालयात सुपूर्द केल्या.

महामारीच्या काळात समाजाला मदत पुरवण्याचे आपले प्रयत्न कायम राखत देशातील आघाडीची स्टील कंपनी म्हणून नावाजल्या जाणार्‍या टाटा स्टील बीएसएलने महाराष्ट्र राज्य सरकारचे पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे 5 व्हेंटिलेटर्स सुपूर्द केले. तसेच विभागाच्या गरजा ओळखून त्यादृष्टीने टाटा स्टील बीएसएलने आपला बंद असलेला क्रायोजेनिक प्लांट पुन्हा सुरु केला आहे. व या प्लांटमधून स्थानिक रुग्णालयांना वैद्यकीय श्रेणीच्या ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ खोपोलीमधील एक सदस्य कंपनी या नात्याने टाटा स्टील बीएसएलने खालापूर सार्वजनिक आरोग्य केंद्र, वावोशी सार्वजनिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय चौक यांना वैद्यकीय उपकरणे देखील मदत स्वरूपात दिली आहेत. खोपोली येथील कोविड-19 रुग्णालयाच्या संचालनात्मक खर्चासाठी कंपनीने 3 लाख रुपयांचे योगदान दिले आहे.

टाटा स्टील बीएसएलने तब्बल 01 हजारपेक्षा जास्त कुटुंबांना अन्नधान्य पुरवले आहे. स्थानिक रुग्णालयांना पीपीई किट्स, आशा कर्मचारी, एएनएम व वैद्यकीय कर्मचार्‍यांना मास्क्स अशी अत्यावश्यक मदत देखील ही कंपनी पुरवत आहे. तसेच स्वयंसहायता गटांच्या महिला सदस्यांना मास्क्स बनवण्याचे प्रशिक्षण देऊन रोजगाराचा अजून एक मार्ग टाटा स्टील बीएसएलने खुला करवून दिला आहे. त्याबरोबरीनेच स्वयंसहायता गटाच्या सदस्यांमार्फत जनजागृतीचे काम देखील टाटा स्टील बीएसएल करत आहे. कोविड-19 चा संसर्ग आणि प्रसार टाळण्यासाठी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ही कंपनी करत आहे. लवकरच टाटा स्टील बीएसएलकडून सरकारला एकूण 15 बायपॅप मशीन्स पुरवल्या जाणार आहेत.

Exit mobile version