जमिनीचे आरोग्य शेतीसाठी महत्त्वाचे

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

नैसर्गिक शेतीने जमिनीचे आरोग्य सुधारते; परंतु रासायनिक अवशेषमुक्त अन्न निर्मितीसाठी प्रयत्न करा. नैसर्गिक शेती केल्यास भरघोस उत्पादन येते. यासाठी जमिनीचे आरोग्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र व छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दि.15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान जिजामाता संकुल, ओरोस येथे आनंदोत्सव कार्यक्रम साजरा होत आहे. या कार्यक्रमांतर्गत नैसर्गिक शेती, आंबा, काजू मोहर संरक्षण, वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण व बांबू लगवड या विषयाच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सावंत उपस्थित होते.

नैसर्गिकरित्या विविध पिकांची लागवड
डॉ. सावंत म्हणाले, ''सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. जमिनीचे उत्तम आरोग्य व संतुलन राखण्यासाठी नैसर्गिक शेती महत्त्वाची आहे. नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यात यावे, जेणेकरून रासायनिक अवशेषमुक्त अन्न व आरोग्य सुरक्षा देता येईल. नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन खर्चात बचत होते. त्यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक बचत होऊन निव्वळ नफा वाढतो. किर्लोस कृषी विज्ञान केंद्र व छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या अनुभवातून शिका. या प्रकल्पांतर्गत नैसर्गिक पद्धतीने विविध पिकांची लागवड केली आहे.''
Exit mobile version