सोलनपाडा पाझर तलाव आटले

कोट्यवधी खर्चूनही पाण्याची गळती

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील सोलनपाडा जामरुंग येथील पाझर तलावामधील पाण्याने तळ गाठला आहे. तलावाच्या भिंतींमधून पाण्याची गळती पाझर तलाव बांधण्यापासून कायम आहे. त्यामुळे पाझर तलाव आटले असल्याने तेथील नळपाणी योजना कोलमडून पडल्या आहेत. दरम्यान, पाण्याची गळती रोखण्यासाठी तब्बल 6 कोटी खर्चूनही पाण्याची गळती सुरुच असल्याने त्या कामाची चौकशी करण्याची मागणी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ करीत आहेत. तसेच, याच परिसरातील कामतपाडा-सराईवाडी भागात प्रस्तावित लघुपाटबंधारे प्रकल्पांचे काम शासनाने पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक शेतकरी करू लागले आहेत.

1975 मध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडून सोलनपाडा गावाच्या वरच्या भागात जामरूग पाझर तलावाची 12 लाखांत बांधणी करण्यात आली होती. त्यानंतर या पाझर तलावाचे पाणी तेथील नदीमध्ये सोडण्यात येऊ लागलेे. परिणामी उन्हाळ्यात कोरड्या राहणार्‍या नदीमध्ये पाणी वाहू लागले आणि पाण्याची टंचाई कमी झाली. तसेच, सोलन पाडा गावापासून सूगवे या भागात नदीच्या बाजूला विहिरी खोदून नळपाणी योजना राबविण्यात येत आहे. मात्र, 2010 पासून या भागातील जनतेकडून पाझर तलावाच्या भिंतींमधून पाण्याची गळती सुरु असल्याच्या तक्ररी येऊ लागल्या आहेत. त्याच काळात सोलन पाडा गावापासून काही अंतरावर असलेल्या डोंगरपाडा येथील पाझर तलाव फुटला होता. 2012 मध्ये या तलावाच्या दुरुस्तीसाठी पाच कोटी खर्च करत नव्याने भिंती बांधण्यात आल्या होत्या. मात्र, तरीदेखील पाण्याची गळती सुरूच राहिल्याने 2022 मध्ये हे पाणी अडविण्यासाठी सहा कोटींचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, तरीदेखील या तलावाची गळती सुरूच राहिली आणि आज पाझर तलावातील पाण्याने तळ गाठला.

सोलनपाडा पाझर तलावातील पाण्याची गळती मागील दोन वर्षात सहा कोटी खर्चून देखील सुटत नाही. यावर्षी मे महिन्याच्या सुरवातीलाच तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे पाझर तलावातून पाझरून जाणारे पाणी वाहून जात असते. त्या पाण्यावर सोलन पाड्याच्या खाली असलेल्या नाल्यावर टेंभरे, रजपे, डुक्कर पाडा, कामत पाडा, सोलन पाडा, हिरेवाडी, ठोंबर वाडी, जामरंग, आंबिवली, किकवी, शिलारवाडी या गावांच्या नळपाणी योजना तयार करण्यात अल्या आहेत. त्यामुळे नदीमधून वाहत जाणार्‍या पाण्यावर अवलंबून असलेल्या 12 गावांच्या नळपाणी योजना कोलमडून गेल्या आहेत.

Exit mobile version