पेण पालिका हद्दीत सौरउर्जा पथदिवे

। पेण । वार्ताहर ।
पालिकेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सुविधा शहरातील नागरिकांना पुरविण्याचे ध्येय हाती घेतलेल्या पेण पालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी जास्तीत जास्त आर्थिक बचत कशी करता येईल, याकडे लक्ष देत आहेत. त्याचेच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे पेण पालिकेने विजेची बचत करण्यासाठी सौर ऊर्जेवरील विविध पथदिवे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जवळपास पन्नास टक्के वीज बचत करण्यात पालिका यशस्वी होत आहे. वाढणारे प्रदुषण आणि विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन राज्यात सौरउर्जेचा वापर व्हावा म्हणून सबसीडी तत्वावर प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचाच भाग म्हणून पेण नगरपालिकेच्या अधिकारी वर्गांनी पेण शहरात सौरउर्जेचा जास्तीत जास्त वापर होण्याच्या दृष्टीने योजनाबद्ध कार्यक्रम आखला आहे व या योजनाबद्ध कार्यक्रमासाठी 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेची मान्यता देखील घेतली आहे.

पेण शहरात आत्तापर्यंत 20 लाखाचा निधी वापरुन 5 हायमास्क, 15 मिनी हायमास्क बसविले आहेत. 5 हायमास्कसाठी 10 लाख 70 हजार 973 रुपये खर्च केले आहे. यामध्ये नरदास चाळ, जैन हॉल, चिंचपाडा गाव, कोथवाल चौक, अंतोरा रोड तर 15 मिनी हायमास्कसाठी 8 लाख 3 हजार 234 रुपये खर्च केले आहेत. तसेच अधिकारी वर्गाकडून जनतेला आव्हान देखील केलेले आहे की, आपल्या परिसरात सौरउर्जा पथदिवे हवे असतील तर मुख्याधिकारी पेण नगरपालिका यांच्याकडे मागणीचे पत्र द्यावे. एकंदरीत शासनाने केलेल्या आव्हानाला पेण नगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी दिलेला प्रतिसाद पाहता. भविष्यात पेण शहरात मोठया प्रमाणावर सौरउर्जेचा वापर केल्याने विजेची बचत केली जाईल. विजेचा तुटवडा व विज संकट पाहता सौरउर्जेवर चालणारे पथदिव्यांबरोबर इतर ठिकाणीही सौरउर्जेचा वापर होणे गरजेचे आहे. इतर नगरपालिकांमध्ये केव्हाच सौरउर्जेचा वापर सुरु झाला आहे. उशिरा का होईना पेण नगरपालिकेने सुरुवात केली आहे.- संतोष पाटील, नगरसेवक

Exit mobile version