। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजेची वाढती समस्या लक्षात घेता सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तब्बल 11 शाळा स्व-खर्चातून सोलर सिस्टीमने जोडण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समितीचे माजी सदस्य संदीप गावडे यांनी दिली. गावडे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 11 शाळांमध्ये सोलार सिस्टीम प्रकल्प राबवणार असून ‘ऑफ ग्रीड रुफ्ट ऑफ सोलार’ या सिस्टीमद्वारे या शाळा सोलारने जोडल्या जाणार आहेत. यातून भविष्यात शासनही प्रेरणा घेऊन अशा प्रकारची सिस्टीम शाळेमध्ये राबवू शकते. प्रायोगिक तत्त्वावर स्व-खर्चातून हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. तालुक्यातील ज्या शाळेची पटसंख्या जास्त आहे, अशा 11 शाळा आम्ही निवडणार आहोत. जेणेकरून शाळेत विजेचा प्रश्न निर्माण होऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर अडथळा येऊ नये. दुसरीकडे सोलर सिस्टिममुळे शाळेतील विजेची बिलेही कमी येणार आहेत.