रायगडातील दुबार मतदारांवर संक्रात

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात मतदार यादीसोबत आधार जोडणीची येत्या 1 ऑगस्ट पासून सुरवात होणार आहे. त्यामुळे मोठया प्रमाणावर दुबार मतदार वगळले जाणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. जास्तीत जास्त मतदारांनी या मोहीमेचा लाभ घ्यावा असे आवाहन रायगडच्या निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे यांनी केले आहे. त्या अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. दरम्यान, शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी देखील मतदारयादीसोबत आधार जोडणीची मागणी केली होती. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत करताना त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून 1 ऑगस्ट पासून मतदारयाद्यांना आधार जोडणीच्या कार्यक्रमाला सुरवात होत आहे. रायगड जिल्ह्यातही हा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. मतदार याद्यांचे प्रमाणीकरण व्हावे, मतदारांची ओळख प्रस्तापित व्हावी, दुबार मतदारांची नावे वगळता यावी यासाठी मतदार याद्यांना आधार जोडणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी 6 ब क्रमांकाचे अर्ज जवळच्या मतदान केंद्र, तलाठी कार्यालये आणि तहसिल कार्यालयात उपलब्ध असणार आहेत. ऑनलाईन पध्दतीनेही हे अर्ज उपलब्ध असणार आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर हा अर्ज उपलब्ध असणार आहे. या शिवाय घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे उबाळे यांनी यावेळी सांगीतले.

मतदारांनी ही नोंदणी आवश्यक असली तरी सक्तीची नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जे मतदार आधार जोडणी करणार नाहीत. त्यांची नावे मतदार यादीतून काढून टाकली जाणार नाहीत. त्यांना निवडणूक आयोगाने नमूद केलेल्या ओळखपत्रांच्या साह्याने मतदान करता येणार आहे. तरीही मतदार याद्यांच्या प्रमाणीकरणासाठी जास्तीत जास्त मतदारांनी आधार जोडणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Exit mobile version