वाहतूक कोंडीवर उपाययोजना

। पालघर । प्रतिनिधी ।

गणेशोत्सव काळात नागरिकांची वाढती रेलचेल पाहता बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवण्याची शक्यता असून सफाळे पोलिसांनी यावर तोडगा काढला आहे. रेल्वे फाटक ते इब्राहिम मंजिल भागात 7 सप्टेंबरपासून ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्यात आले असून या नियमाचे पालन न करणार्‍या वाहनचालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

पालघर तालुक्यातील सफाळेतील पूर्व, पश्‍चिम भागातील सुमारे 50 ते 55 गावापाड्यातील नागरिकांना दैनंदिन आणि सणउत्सवाच्या खरेदीसाठी सफाळे बाजारपेठेचा एकमेव पर्याय आहे. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम असल्याने नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत आहेत. अशातच दैनंदिन वाहनचालकांमुळे सफाळे रेल्वे फाटकापासून ते थेट स्टेट बँक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत आलेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास होतो.

यासंदर्भात सफाळे पोलिसांनी यापूर्वीच सम व विषम पद्धतीने पार्किंगची व्यवस्था केली आहे. मात्र, सणउत्सवाच्या वेळी पार्किंग केलेल्या वाहनांमुळे तसेच रेल्वे फाटक बंद असल्यावर वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना चालणे जिकारीचे होते. सोबतच वाहतूक पोलिसांवरदेखील त्याचा ताण वाढत आहे. याकरिता सफाळे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी वाहतूक कोंडीचा त्रास दूर करण्यासाठी 7 सप्टेंबरपासून सफाळे बाजारपेठेत नो पार्किंग झोनची उपाययोजना जाहीर केली आहे.

Exit mobile version