मच्छिमारांच्या समस्यांचे निराकरण करा

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले निर्देश
। श्रीवर्धन । वार्ताहर ।
मच्छिमारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मत्स्यविकास राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीस मेरिटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शर्मा, वरिष्ठ अभियंता सुधीर देवरे, मत्स्यविकास विभागाचे सह आयुक्त रा.ज. जाधव, सहायक आयुक्त सुरेश भारती जीवना, भरडखोल येथील कोळी बांधव यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मत्स्यविकास राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यातील स्थानिक मच्छिमारांना येणार्‍या विविध समस्या सोडविण्यासंदर्भात चर्चा पार पडली. यावेळी कोळी बांधवांनी मत्स्य परवाना, जेट्टी बांधणे, खडींची अडथळे, नोकरीत स्थानिकांना प्राधान्य, घरकुल, किसान क्रेडीट कार्ड अशा विविध समस्या मांडल्या. यावेळी मच्छिमारांच्या समस्यांचे नियमांतर्गत निराकरण करण्यात यावे असे निर्देश राज्यमंत्री श्री.दत्तात्रय भरणे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.
श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव कोळीवाडा येथे नौका नोंदणीबाबत गैरव्यवहार होऊ नये यासाठी संबंधित अधिकार्‍यांना मत्स्य व्यवसाय विभागाने दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे व येथे असलेल्या 80 ते 90 मासेमारी नौकांना खडकाळ किनार्‍यामुळे असलेला धोका ंलक्षात घेता, त्यांच्या सुरक्षिततेसाठी 50 हजार चौरस मीटरचा खडकाळ भाग मोकळा करण्याच्या कामांना गती देण्याचे निर्देश मत्स्यविकास राज्यमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांनी दिले. आदगाव येथील मासेमारी बंदराचा विकास करण्याचा प्रस्ताव केंद्रात पाठविण्यासंदर्भातील कामास गती देणे, मच्छिमारांची बँक असण्यासंदर्भातील प्रस्तावावर सकारात्मक विचार करणे, तीन प्रस्तावीत जेट्टींच्या कामास गती देणे, ज्या मच्छिमार संस्था बंद आहेत त्यांना मोठ्या सुरू असलेल्या संस्थेत कोटा वर्ग करून डिझेल उपलब्ध करून देणे व स्थानिक बँकांतील अधिकार्‍यांशी संपर्क साधून किसान क्रेडिट कार्डचे निधी उपलब्ध करून देण्याबाबत ही राज्यमंत्री भरणे यांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या.

Exit mobile version