ठाकरेंच्या मालमत्तेबाबत सोमय्यांची याचिका

। मुंबई । प्रतिनिधी ।
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकीकडे पक्षांतर्गत कलहात अडकले असताना बुधवारी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्याविरोधात मुरुडमधील मालमत्ता खरेदीबाबत ईडी तपासाची मागणी करणारी जनहित याचिका दाखल केली. ही मालमत्ता खरेदी करताना ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे या खरेदी व्यवहाराची ईडी आणि अन्य यंत्रणांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी याचिकेत केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी, शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. संबंधित मालमत्ता रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी मूळ मालक अन्वय नाईक यांच्याकडून सुमारे दोन कोटींना खरेदी केली आहे. निवडणुकीदरम्यान ठाकरे आणि वायकर यांनी ही मालमत्ता कमी मूल्यांची असल्याचे प्रतिज्ञापत्रात भासवले असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. तसेच समुद्रकिनारा जवळच असल्यामुळे सागरी किनारा नियमांचे पालनही करण्यात आले नाही, असेही म्हटले आहे. शिवाय ही मालमत्ता वनक्षेत्रात असून त्याबाबत आवश्यक पूर्तता करण्यात आलेल्या नाहीत, असा दावाही याचिकेत केला गेला आहे. सोमय्या यांनी यापूर्वीही संबंधित मालमत्तेबाबत आरोप केले असून ठाकरे यांनी त्याचे खंडन केले आहे. याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version