अलिबाग शहरामध्ये चर्चेला उधाण
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची आणि चर्चेची बाब समोर आली आहे. शासकीय सेवेत असताना लाचलुचपत प्रकरणात अटक झालेल्या अप्पर कोषागार अधिकाऱ्याच्या जवळच्या नातेवाईकाने भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरून निवडणुकीत प्रवेश केला असून त्यामुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.
अलिबागमधील अपर कोषागार असलेले रमेश इंगळे यांना लाच घेताना अडीच वर्षापुर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. अलिबाग पोलीस ठाण्यात याची नोंददेखील असून नोंद क्रमांक 32 अशी आहे. त्यांच्याच घरातील एकाला भाजपने उमेदवारी दिल्याने अलिबागमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
रमेश सिताराम इंगळे हे अलिबाग येथील जिल्हा कोषागार कार्यालयात जिल्हा अपर कोषागार अधिकारी पदावर कार्यरत होते. तक्रारदाराने त्यांचे वैद्यकिय बिल मंजूर करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयात अर्ज केला होता. हे बिल मंजूर करण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली होती. रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाककडून लाच घेतल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. 22 जून 2023 मध्ये ही घटना घडली होती. या घटनेनंतर बराच काळ गेला असला, तरी नगरपरिषदेच्या निवडणूकीत लाचखोराचे नातेवाईक उभे राहिल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. शासकीय सेवेत लाच घेतल्याच्या आरोपानंतर जवळच्या नातेवाईकाला पक्षाने उमेदवारी देणे योग्य आहे का, या मुद्द्यावरही शहरभर कुजबुज सुरू आहे. विशेष म्हणजे, इंगळे हे निवृत्तीला काही महिने शिल्लक असताना कारवाई झाली होती. स्थानिक नागरिकांमध्ये भाजपच्या निवडणूक धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अडकलेल्या व्यक्तीने पक्षात प्रवेश केला की त्याला क्लीनचिट मिळते, अशी टीका काही नागरिकांकडून होत आहे.







