शरद पवार गटाचे उर्वरित आमदार महायुतीत ?

गुप्त चर्चेबाबत शंभूराज देसाई यांचा गौप्यस्फोट
| मुंबई | वृत्तसंस्था |
राज्याच्या राजकारणात राजकीय उलथापालथ सुरु आहे. शरद पवार गटातील नेते महायुतीच्या सरकारमध्ये येण्यास इच्छुक आहेत. संबंधित नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा सुरू आहे. दसऱ्यातही आपण जोरदार धमाके करतो, उत्साह साजरा करतो. दिवाळी जवळ आली आहे, त्यामुळे धमाका सुरू झाला आहे, असा गौप्यस्फोट शंभूराज देसाई यांनी केला.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शंभूराज देसाई म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटातील काही नेते महायुतीच्या सरकारमध्ये यायला इच्छुक आहेत. असे बरेच लोक आहेत. आमचे दोन-तीन जे महत्त्वाचे नेते आहेत, त्यांच्याशी याबाबत अंतर्गत चर्चा सुरू आहेत. त्यामुळे जसे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली 9 मंत्र्यांनी अचानक शपथ घेतली, कदाचित तसेच घडण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असेही मंत्री देसाई यांनी पुढे नमूद केले.

काही दिवसांपूर्वी अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. सत्तेत सहभागी होताच अजित पवार गटाच्या नऊ आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागली. अजित पवार गटाने अचानक सरकारला पाठिंबा दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. काहीही झालं तरी भारतीय जनता पार्टीबरोबर जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे. असे असलेतरी शंभूराज देसाई यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

Exit mobile version