मुंबई-गोवा महामार्ग! ठेकेदार कंपनीकडून आराखडयाची ऐसी की तैसी

। पोलादपूर । प्रतिनिधी ।
मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर पोलादपूर शहरातील महामार्ग अंडरपासच्या खंदकातून बॉक्स कटींग भुमिगत स्वरूपाच्या एका मार्गिकेवरून सुरू झाली आहे. मात्र अद्याप पृष्ठभागावरून सर्व्हिस रोड कसा न्यायचा आणि ड्रेनेज कम फुटपाथ कसा असावा, याबाबत नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियामार्फत आराखडयामध्ये दिलेले निर्देश एल अ‍ॅन्ड टी कंपनीकडून दूर्लक्षित करण्यात आले आहेत. पश्‍चिमेकडील सर्व्हिसरोडची लांबी कमी असताना ड्रेनेज कम फुटपाथची जागा फक्त दोन फूट ठेवण्यात आल्याने आराखडयाची ऐसीकी तैसी झाली आहे. त्यामुळे पोलादपूरकरांचे भवितव्य पूर्णपणे धोक्यात आले आहे.

शहरातील चौपदरीकरणाबाबत सुरूवातीपासूनच प्रशासन आणि ठेकेदार कंपनीकडून काहीसे ढिसाळ धोरण अवलंबिण्यात आले. मोबदला घेऊनही ताबा न सोडल्याने पश्‍चिमेकडील सर्व्हिस रोडचे काम आजमितीस मुर्त स्वरूपात आले नसल्याचे दिसून येत नाही. पोलादपूरच्या पश्‍चिमेकडील सर्व्हिसरोड आणि त्यावरील ड्रेनेज कम फूटपाथचे काम अद्याप सुरू झाले नसून त्या सर्व्हिसरोडची रूंदी 7.50 मीटर्स तर लांबी 1080 मीटर्स तसेच ड्रेनेज कम फूटपाथची रूंदी 1.5 मीटर्स असल्याचे राष्ट्रीय महामार्गाच्या अंतिम आराखडयामध्ये नमूद करण्यात आले आहे. पोलादपूर शहरातील ग्रामीण रूग्णालयासह पार्टेकोंडपर्यंत सर्व्हिस रोड व ड्रेनेज कम फुटपाथ असूनही प्रभातनगरपर्यंतच पश्‍चिमेकडील सर्व्हिसरोड दिसून येत आहे. पोलादपूर घाटेआवाड येथे आराखडयानुसार ड्रेनेज कम फूटपाथची रूंदी 1.5 मीटर असण्याऐवजी केवळ दोन फूट असलेली दिसून येत आहे.

पुर्वेकडील सर्व्हिस रोडपासून पश्‍चिमेकडील सर्व्हिसरोडपर्यंत जाण्यासाठी केवळ एकाच व्हेईकल ब्रिजची तरतूद असताना एल अ‍ॅन्ड टी ठेकेदार कंपनीने आणखी चार व्हेईकल ब्रिज उभारल्याने त्या पुलांचा आराखडयात समावेश करावा लागला. याखेरीज, ठेकेदार कंपनीने रयत शिक्षण संस्थेच्या एस.टी. स्थानकालगतच्या इमारतीपर्यंतच्या पुर्वेकडील सर्व्हिसरोडलगत बांधलेली काँक्रीटची संरक्षक भिंत ही देखील आराखडयामध्ये समाविष्ट नव्हती. पोलादपूरच्या पूर्वेकडील सर्व्हिस रोडची रूंदी 7.50 मीटर्स तर लांबी 850 मीटर्स तर ड्रेनेज कम फूटपाथची रूंदी 1.5 मीटर्स असूनही या ड्रेनेज कम फूटपाथलगत इमारतींचे बांधकाम झाले आहे.

पोलादपूर शहरात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण आणि सर्व्हिस रोड तसेच ड्रेनेज कम फूटपाथच्या कामाबाबत प्रशासन, ठेकेदार कंपनी आणि स्थानिक महामार्गबाधितांचा ताळमेळ नाही की मिलीभगत आहे, याबाबत निश्‍चित असे उत्तर प्राप्त होत नसून या अनागोंदी कारभारामुळे पोलादपूर शहर पुर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत होते ते महामार्ग भुमिगत गेल्याने अधांतरी झाल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version