पैशासाठी केली आईलाच मारहाण

। मुंबई । प्रतिनिधी ।

वाशी येथील सेक्टर 14 मध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका वयोवृद्ध महिलेला तिच्याच मुलाने मारहाण करून तिने जमा केलेली पाच लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाशी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

वाशी सेक्टर 14 मधील एमजी कॉम्फ्लेक्स येथील श्री आनादपूर मठामध्ये प्रेमलता सोबती (65) या सेवादार म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांचा मुलगा दीपक हादेखील त्याच मठामध्ये राहतो. त्याला नशा करण्याची सवय आहे. सोमवारी (दि. 09) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास दीपक मठामध्ये गेला. त्याने आपल्या आईला शिवीगाळ करत मारहाण करून मठाचा दरवाजा उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने मठामधील लाकडी कपाट उघडून प्रेमलता यांनी जमा करून ठेवलेली सुमारे पाच लाख 50 हजार रुपये लुटले आणि तेथून पसार झाला.

याबाबत प्रेमलता यांनी आपल्या मुलाविरोधात वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी आरोपी दीपक सोबती याच्याविरोधात जबरी लूट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला सोमवारी अटक केली. तसेच, त्याच्याकडून सुमारे दीड लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे. उर्वरित रक्कम त्याने कुठे ठेवली याचा पोलिस शोध घेत आहेत.

Exit mobile version