रायगडच्या सुपुत्राने केले ‘हनुमान टिब्बा’ शिखर सर

मॅकमोहन हुले जिल्ह्यातील एकमेव गिर्यारोहक

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

मॅकविला-द-जंगल यार्डचे संस्थापक व सुधागड तालुक्याचे सुपुत्र प्रसिद्ध गिर्यारोहक मॅकमोहन हुले यांनी हिमाचल प्रदेशातील धौलाधार आणि पीर पांजल रांगेच्या मध्यवर्ती असलेले आणि या भागातील सर्वात उंच आणि अत्यंत अवघड समजले जाणारे माऊंट हनुमान टिब्बा (उंची 5 हजार 982 मीटर (19626 फुट) हे शिखर नुकतेच यशस्वीरीत्या सर केले. माऊंट हनुमान हे अत्यंत अवघड शिखर सर करणारे मॅकमोहन हुले हे रायडगड जिल्ह्यातील पहिले गिर्यारोहक ठरले आहेत.



अपघात मुक्त गिर्यारोहण क्षेत्र व भविष्यात महाराष्ट्रात पर्वतारोहण संस्थेची स्थापना करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट होते. हिमाचल प्रदेशात आलेल्या पुरामुळे सगळीकडे गोंधळाची परिस्थिती होती. वीज गायब झाली होती. मोबाईल इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद होती. पाणी, इंधन, फळं आणि भाजीपाला नव्हता. सुरक्षेच्या कारणास्तव काही दिवस बुरूवा गावातच थांबावे लागले आणि शनिवारी सुखरूपपणे टीम मुंबई इथे पोहोचली.


महाराष्ट्रातील गिरीमित्र प्रतिष्ठान संस्थेच्या मंगेश कोयंडे, मॅकमोहन हुले, अमोल आळवेकर व अरविंद नवेले या चार क्लाइंबिंग सदस्यांनी आणि विशाल ठाकूर, गोपाळ ठाकूर व भागचंद ठाकूर या गाईड अशा एकूण सात जणांनी सहभाग घेतला होता. मॅकमोहन हुले हे या मोहिमेचे उपप्रमुख होते. मॅकमोहन हुले हे व्यावसायिक गिर्यारोहक व आयएमएफचे रूट सेटर आहेत. त्यांनी बेसिक आणि इतर बरेच प्रशिक्षण पूर्ण केले आहेत. त्यांनी सह्याद्रीतील अनेक सुळके कातळभिंती सर केल्या आहेत. शिवाय ‌‘मॅकविला द जंगल यार्ड’चे संस्थापक आहेत. या मोहिमेसाठी हुले यांना नांदगाव हायस्कूलचे शिक्षक अशोक शिंदे सर यांनी पाच हजार, दिनेश कदम दोन हजार रुपयांची व गावातील इतर सदस्य आणि मित्रपरिवाराकडून आर्थिक मदत मिळाली.


कठीण परिस्थितीत सर
मोहिमेतील अवघड समाजाला जाणारा टेंटू पास, समिट कॅम्प, हनुमान तिब्बाचा शिखरमाथा मॅकमोहन व टीमने लीलया पार केला. मोठ्या प्रमाणात पाऊस, बर्फवृष्टी, साधारण 100 कि.मी. प्रतितासच्या गतीने वाहणारे हिमवारे, अंधुक प्रकाश, पाण्याची आणि ऑक्सिजनची कमतरता असे निसर्गाचे अवघड टप्पे पार करून त्यांनी ही मोहीम पूर्ण केली.

हे शिखर पार करणारा जिल्ह्यातील पहिला एकमेव गिर्यारोहक झाल्याने खूप अभिमान वाटत आहे. नवोदितांना या क्षेत्रात येण्यासाठी व प्रोत्साहन मिळण्यासाठी महाराष्ट्रात पर्वतारोहण संस्थेची स्थापना होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अशा प्रकारच्या मोहिमांसाठी व प्रशिक्षण घेण्यासाठी गिर्यारोहक व पर्वतारोहकांना शासन, स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींमार्फत आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे.

मॅकमोहन हुले, गिर्यारोहक व प्रस्तरारोहक
Exit mobile version