। बीड । प्रतिनिधी ।
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे खा. बजरंग बप्पा सोनवणे यांनी पोलिसांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला आहे. हत्येच्या घटनेला 16 दिवस उलटून गेले आहेत. तरीही या हत्याकांडाचा मास्टरमाईंड आणि तीन आरोपी फरार आहेत. त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी सोनवणे यांनी बीडमधील पत्रकार परिषदेत केली आहे.
संतोष देशमुख यांनी काय गंभीर गुन्हा केला होता? टॉर्चर करून त्यांची हत्या करण्यात आली. 6 डिसेंबरला पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल करून का घेतला नाही? 6 आणि 9 डिसेंबरला पोलिसांना कोणी फोन केला? बनसोड नावाच्या पीआयला कोणाचा फोन आला? 10 डिसेंबरला संध्याकाळी गुन्हा दाखल होतो. तेही पोलीस अधीक्षक आल्यावर. पोलीस अधीक्षकही पोलीस ठाण्यात येत नाहीत. दुसरीकडे येऊन टाइप करून ते जातात. म्हणजे किती दहशत आहे. ही कुणाची दहशत होती? हे सुद्धा पीआय, पीएसआयने सांगितले पाहिजे, अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे.