। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
रायगडचे दक्षिण काशी म्हणून समजले जाणारे मुरुड तालुक्यातील एकदरा डोंगरापलीकडे समुद्रकाठी वसलेले शंकराचे पवित्र स्थान आहे. या परिसराला गोमुख नावाने ओळखले जाते. काळ्या खडकात डोंगराच्या कपारीत वासलेले हे गोमुख पर्यटकांचे अतिशय आवडते ठिकाण आहे. तसेच, गोमुखासमोर विशाल समुद्र, डाव्या बाजूला अभेद्य जंजिरा किल्ला तर उजव्या बाजूला पद्मदुर्ग किल्ला आहे. अश्या विशेष पर्यटन स्थळाला विकासासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
रायगडचे विद्यमान खा. तटकरे यांनी एकदरा पूल ते गोमुख मार्गे खोरा बंदर रस्ता करून परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता. परंतु, पुढे कोणतीही हालचाल झालेली नाही. जर तो प्रस्ताव मंजूर होऊन प्रत्यक्षात आला असता तर मुरूडमध्ये आणखी एका पर्यटनस्थळाची भर पडली असती. यामुळे येथील नागरिकांडून विद्यमान खासदारांवर नाराजी व्यक्त होत आहे.
गोमुखावर महाशिवरात्रीला सकाळपासून भक्तांची दर्शनासाठी रांग लागते. सध्या भक्तांना एकदरा गावातून खराब रस्तावरुन चालत जावे लागते. सुशोभीकरणाचा प्रस्ताव झाला तर भक्त व पर्यटक आपली गाडी गोमुखावर घेऊन जाऊ शकतात. तसेच, या परिसरातील निसर्गाचे नयनरम्य दर्शन घेऊन शकतात.
– अर्चना नवले, पर्यटक







