दक्षिण रायगड प्रीमिअर लीग

शम्स इलेव्हन संघ विजेता

| महाड | प्रतिनिधी |

चैतन्य सेवा संस्था महाडतर्फे कै.माणिकराव जगताप क्रीडानगरी नवेनगर महाड येथे दक्षिण रायगड प्रीमियर लीग 2023 या मर्यादित षटकांच्या ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेत शम्स एलेव्हन संघाने प्रथम क्रमांक, गणेश स्पोर्ट्स माणगावने द्वितीय तर शिंदे वॉरियर्स संघाने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच शम्स इलेव्हनच्या नदीम धायरेकर याची मालिकावीर व सामनावीर म्हणून, अफजल इलेव्हनच्या यश पाष्टेची उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, शिंदे वॉरियर्सच्या सूरज पशिलकरची उत्कृष्ट गोलंदाज तर आर्यन वॉरियर्सच्या सूरज म्हसकरची उत्कृष्ट फलंदाज म्हणून निवड करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

स्पर्धेचे उद्घाटन वरिष्ठ नेते हनुमंत उर्फ नाना जगताप व चैतन्य सेवा संस्था महाडचे अध्यक्ष चेतन उतेकर यांच्या हस्ते करण्यात आले. आ.भरत गोगावले यांनी देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन महत्त्वपूर्ण सहकार्य केले. लिलाव पद्धतीने निवड केलेल्या या स्पर्धेसाठी एकूण 20 संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी रुपये दोन लाख, द्वितीयसाठी एक लाख तर तृतीय क्रमांकासाठी पन्नास हजार व आकर्षक चषक अशी बक्षिसांची रचना होती. त्याचप्रमाणे मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी विविध बक्षिसे ठेवण्यात आली होती. स्पर्धेमध्ये प्रत्येक संघात स्टार आयकॉन खेळाडू खेळवले गेल्याने आपल्या आवडत्या स्टार आयकॉनला पाहण्यासाठी प्रत्येक दिवशी क्रिकेटप्रेमींची मोठी गर्दी पहावयास मिळाली. अंतिम सामन्यात उभय संघांना शुभेच्छा देण्यासाठी व नाणेफेकीसाठी महाडचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांची विशेष उपस्थिती होती. स्पर्धे दरम्यान राकेश शहा, ईश्‍वर पटेल, जयपाल रावल, प्रवीण चांदोरकर, अब्दुल झमाने, पंकज उमासरे, अभिजीत पोटे, पंकज देशमुख, शंकर आवटी, पत्रकार रवी शिंदे, सचिन राऊत यांसह इतर मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.

स्पर्धेसाठी पंच म्हणून रत्नागिरीचे गणेश साळवी, शहापूरचे हेमंत शेट्टी, अंबरनाथचे अभय पाटोळे आणि बदलापुरचे कुणाल पेणकर यांनी तर समालोचक म्हणून हर्षल मुंढे, किशोर कोकरे, अब्दुल झमाने, परेश गांधी यांनी चोख भूमिका बजावली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगेश पेणकर, गिरी, शहा खालिद, असिफ माटवणकर, अदनान जलाल, अखिल जोशी, समीर वजगरे, यश जाधव, अजिंक्य सुतार यांनी अथक परिश्रम घेतले.

Exit mobile version