टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा संघ
। स्पेन । वृत्तसंस्था ।
टी-20 वर्ल्ड कप उपप्रादेशिक युरोप पात्रता गटात स्पेन क्रिकेट संघाने ग्रीस क्रिकेट संघाचा 7 गडी राखून पराभव केला. हा सामना जिंकून स्पेनने इतिहास रचला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक सामने जिंकणारा हा संघ बनला आहे. संघाने आतापर्यंत सलग 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. यापूर्वी सर्वाधिक 13-13 टी-20 सामने जिंकण्याचा विश्वविक्रम मलेशिया आणि बर्म्युडाच्या नावावर होता.
क्रिकेट हळूहळू जगभरात आपले पाय पसरत आहे. हा खेळ फुटबॉलप्रमाणे जागतिक स्तरावर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज आहे. आता क्रिकेट युरोप खंडात लोकप्रिय होत आहे. चाहते या खेळाशी सतत जोडले जात आहेत. क्रिकेटमध्ये जेव्हा विक्रम होतात किंवा मोडले जातात. तेव्हा चाहत्यांसाठी ते खूप रोमांचक असते. स्पेनच्या फुटबॉल संघाची गणना सर्वोत्तम संघांमध्ये केली जाते. फुटबॉलपाठोपाठ आता स्पेन क्रिकेटमध्ये पण धुमाकूळ घालत आहे. स्पॅनिश क्रिकेट संघाने 25 फेब्रुवारी 2023 पासून सलग 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. विश्वविक्रम करण्यासाठी स्पेनने आयल ऑफ मॅन, जर्सी, क्रोएशिया, सायप्रस, झेक प्रजासत्ताक आणि ग्रीस या संघांना पराभूत केले आहे. दुसरीकडे, भारतीय संघाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग 12 सामने जिंकले आहेत. नोव्हेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 दरम्यान भारताने हे सामने जिंकले होते. अफगाणिस्तान क्रिकेटने सलग 12 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही जिंकले आहेत.
स्पेनविरुद्धच्या सामन्यात ग्रीक संघाने प्रथम फलंदाजी करत 96 धावा केल्या. यानंतर स्पेनने या लक्ष्याचा सहज पाठलाग केला. स्पेनकडून मोहम्मद इसानने सर्वाधिक 26 धावांचे योगदान दिले. यासिर अलीने 25 आणि हमजा दारने 32 धावा केल्या. या खेळाडूंमुळे स्पेनला सामना जिंकण्यात कोणतीही अडचण आली नाही. यासिर अलीने फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही ताकद दाखवली. त्याने तीन विकेट्सही घेतल्या. याच कारणामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग सामने जिंकणारे संघ
स्पेन-14,मलेशिया-13
बर्म्युडा-13, भारत-12
अफगाणिस्तान-12