‘रायगड’वरुन ठिणग्या

सातारा, शिरुर, बारामती आम्हीच लढणार अजितदादा

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गट, भाजप आणि अजितदादा गट यांच्यात आतापासूच जोरदार ठिणग्या पडू लागल्या आहेत. भाजपने काही महिन्यांपूर्वी आयात केलेल्या एका नेत्यांना रिंगणात उतरवण्याची तयारी केली असल्याची चर्चा असतानाच शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांनी अलिकडे या जागेवर हक्क सांगितला होता. पण रायगडची जागा आमच्याकडे असल्याने ती आम्हीच लढणार असे अजित पवार यांनी शुक्रवारी कर्जतमध्ये जाहीर करून टाकल्याने या मुद्द्यावरून सत्तारुढ गटात मोठा संघर्ष सुरू झाला आहे. दरम्यान, शिरुर, सातारा या जागांसह बारामती देखील लढवण्याची घोषणा अजितदादांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसांच्या शिबिराचा शुक्रवारी कर्जतमध्ये समारोप झाला. या शिबिराच्या दुसऱ्या दिवशी पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण बरेच स्फोटक होते. शरद पवार यांनीच भाजपसोबत जाण्यास आपल्याला सुचवले होते व त्यासाठीच त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामाही दिला होता, असा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला. लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्या विद्यमान जागांखेरीज उद्धव ठाकरे गटाकडील काही जागा लढण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. याबाबत शिंदे गट व भाजपशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. गेल्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांनी, भाजप 48 पैकी 26 जागा लढवेल असे विधान केल्याचे प्रसिध्द झाले होते. नंतर त्यांनी त्याचा इन्कार केला होता. त्याच वेळी असे कोणतेही वाटप झालेले नाही, असे अजितदादा यांनी सूचित केले होते. आज त्याचा थेट उल्लेख न करता याबाबत चर्चा बाकी असल्याच्या आपल्या भूमिकेचा त्यांनी अप्रत्यक्षरीत्या पुनरुच्चार केला.

यावेळी सातारा, शिरुर, बारामती व रायगड या जागा आपण लढवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. यापैकी रायगडचे खासदार सुनील तटकरे हे दादांसमवेत आहेत. मात्र शिरुरचे अमोल कोल्हे व बारामतीच्या सुप्रिया सुळे शरद पवार गटाकडे आहेत. मावळचा उल्लेख करण्याचे मात्र अजितदादांनी टाळले. गेल्या वेळी तेथे त्यांचे पुत्र पार्थ पवार पराभूत झाले होते. रायगडमध्ये सुनील तटकरे पुन्हा रिंगणात उतरणार का याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असते. भाजपने एका आयात नेत्याला उमेदवारी देण्याची तयारी केली आहे. त्याच वेळी शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षांनी भाजपमध्ये नव्याने आलेल्या काही नेत्यांवर बांडगूळ असल्याची टीका करून रायगड लोकसभेची जागा आम्हीच लढवणार, असे जाहीर केले आहे. त्यामुळे रायगडच्या निमित्ताने सध्या पडणाऱ्या या ठिणग्यांचा वणवा होण्याची शक्यता आहे.

रायगडसह आता इतर 3 जागांवर अजित पवार गटाचे उमेदवार कोण असतील हे पाहणंही महत्त्वाचं आहे. राष्ट्रवादीच्या जागा आहेत. त्या आपण लढवूच, पण त्याचबरोबर ठाकरे गटाकडे ज्या जागा आहेत, त्यापैकी तेथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असेल तर तिथे भाजप आणि शिंदेंशी चर्चा करून आपल्याला जागा वाटप करता येईल, असेही अजित पवार म्हणाले.राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे निवडणूक लढवतात. मात्र, आता अजित पवार या ठिकाणी कोणता उमेदवार देणार याकडे राज्याचं लक्ष आहे. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार घरातील कोणत्या व्यक्तीला उमेदवारी देणार किंवा कुटुंबातील कटूता टाळण्यासाठी बाहेरील उमेदवार उभा करणार हे पाहणे महत्वाचं आहे.

दुसऱ्यांच्या ताटातले ओढून घेणे ही आपली संस्कृती नाही, ओबीसींच्या कोट्यातून मराठा आरक्षण नको. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं अशी आमची भूमिका आहे. यासाठी जातींची गणना ही करावी याबाबत भुजबळ यांची भूमिका योग्य आहे.

अजित पवार, उपमुख्यमंत्री

मी लोकशाहीवर प्रेम करणारी नागरिक आहे. एखाद्या पक्षाला कुठून लढायचं आहे, हा त्यांना अधिकार आहे. बारामतीत लढण्याचेदेखील अजित पवार यांच्या निर्णयाचे स्वागत करते. मात्र, जनता ठरवेल कोण जिंकेल ते.

-खासदार सुप्रिया सुळे (शरद पवार गट)
Exit mobile version