अलिबाग | वार्ताहर |
अलिबाग येथील साप्ताहिक रायगडचा युवकचे संपादक जयपाल पाटील यांना विशेष दर्पण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण वसंत भोसले यांच्या हस्ते पोंभुर्ले, ता. देवगड, जि.सिंधुदुर्ग येथे संस्थेने उभारलेल्या ‘दर्पण’ सभागृहात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके, पोंभुर्ले गावचे उपसरपंच प्रदीप फाळके, सुधाकर जांभेकर, शांताराम गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी सभागृहातील जांभेकरांच्या अर्धपुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दर्पण स्मरणिकेचे प्रकाशन होऊन सन 2019 व सन 2020 च्या दर्पण पुरस्काराचे वितरण वसंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कार प्राप्त पत्रकरांच्यावतीने योगेश त्रिवेदी, मंगेश चिवटे. मिलिंद चवंडके, जयपाल पाटील, संतोष कुळकर्णी, प्रा.रमेश आढाव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विजय मांडके यांनी केले. सूत्रसंचालन करून आभार अमर शेंडे यांनी मानले.







