। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील पोल्ट्री फार्म व्यावसायिक आणि उत्पादक यांच्यासाठी नोंदणी प्रक्रियेबाबत शिबीर घेण्यात आले. पशुसंवर्धन विभाग कर्जत यांच्यामार्फत तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय कर्जत येथे कुक्कुट फॉर्मधारक यांच्यासाठी हे मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते.
कुक्कुट पालन-पोल्ट्री फीड-कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगबाबत शासन निर्णय, इतर संबंधित अपडेट होण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार पोल्ट्री व्यावसायिक आणि लघु व्यावसायिक यांच्याकडे कर्जत येथे मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. पोल्ट्री उत्पादक आणि पशुपालक यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा सहायक आयुक्त पशुसंवर्धन कर्जत डॉ. गिरीश बारडकर, तालुका पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, पशुसंवर्धन विभाग कर्जतचे डॉ. सुवर्णलता मनगुळी, डॉ. आसाराम काळे, सूर्यपंखा पारखे, गणेश निरगुडा आदी अधिकारी वर्ग उपस्थित होता. या विशेष मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून, सहा. आयुक्त पशुसंवर्धन कर्जत डॉ. गिरीश बारडकर यांनी कर्जत तालुक्यातील 3000 कुक्कुट पक्षीपेक्षा जास्त क्षमतेचे सर्व पोल्ट्री फार्मधारक यांना, विहीत नमुन्यातील अर्ज भरून पोल्ट्री फार्म नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहनही केलेले आहे.
या शिबिरात कर्जत तालुक्यातील कुक्कुट पालक, पोल्ट्री फॉर्मधारक दिपक भगत,अनिल शेमटे, विलास मोडक, दाजी पारधी, प्रतिक घरत, हनुमंत पाटील, किरण पाटील तसेच अन्य पोल्ट्री उत्पादक उपस्थित होते. शिबिरात उपस्थित राहिलेल्या पोल्ट्री फॉर्मधारक यांचे पोल्ट्री फार्म नोंदणी प्रक्रियाकरीता विहित नमुन्यात अर्ज भरून घेण्यात आले.







