। ठाणे । प्रतिनिधी ।
पाणीटंचाईचे चटके आता स्मार्ट सिटी असा उल्लेख होणार्या ठाणे शहरालाही बसू लागले आहेत. शहराची लोकसंख्या 25 लाखांच्या पुढे गेली असून, पाणीपुरवठा अत्यंत अपुरा पडत आहे. त्यातच आता कडक उन्हाळा सुरू असल्याने अनेक भागात टँकरने पाणी पुरवावे लागत आहे. सध्या मिळत असलेले पाणी नागरिकांनी योग्य प्रकारे व जपून वापरण्यासाठी खास फॉर्म्युला तयार केला आहे. पाण्याची बचत करण्याबरोबरच शॉवरखाली अंघोळ करू नका. तसेच, आठवड्यातून एकदाच कपडे धुवा, अशा विविध प्रकारच्या सूचना महापालिकेने केल्या आहेत.
ठाणेकरांना स्टेम, एमआयडीसी, मुंबई महापालिका अशा विविध स्रोतांमार्फत रोज 585 दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा केला जातो. परंतु, हे पाणी सध्याच्या उन्हाळ्यामुळे कमी पडत आहे. एकीकडे धरणातील पाणी कमी होत असून विहिरी व कूपनलिकांमधील पाण्याची पातळीदेखील घसरली आहे. टंचाई निर्माण झाली असूनही अनेक नागरिक बेफिकीरपणे पाण्याचा वापर करतात. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रहिवाशांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात अनेक सोसायट्या आहेत. अनेकदा इमारतीच्या छतावरील टाकी ओव्हरफ्लो होऊन मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते. यासंदर्भात आवश्यक असलेली दुरुस्ती सोसायटीने करून घ्यावी. पाणी वाया जात असल्याची तक्रार पालिकेकडे आली तर संबंधित सोसायटीचे नळ कनेक्शनच कापण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.