द्रुतगती मार्गावर 24 तास नजर

| मुंबई | प्रतिनिधी ।

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीस शिस्त लागून अपघातांची संख्या लक्षणीयरीत्या कमी करण्याच्या उद्देशाने 1 डिसेंबरपासून विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिले आहेत. त्यानुसार तब्बल सहा महिने द्रुतगती मार्गावर प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि महामार्ग पोलिसांची 24 तास करडी नजर ठेवण्यात येणार असून त्यासाठी पथकही नेमण्यात येणार आहे.

अपघाती मृत्यूंची संख्या वाढू लागल्याने महामार्गावरील सुरक्षित वाहतुकीकडे अधिक लक्ष देण्यात येत आहे. विविध उपाययोजनांनंतरही द्रुतगती मार्गावरील अपघात कमी होत नसल्याचे चित्र आहे. नियमांच्या काटेकोर अंमबलजावणीनंतरही बेदरकारपणे वाहन चालवणार्‍यांची संख्या कमी झालेली नाही. महामार्गावरील एका तपासणी पथकात किमान दोन मोटार वाहन निरीक्षक दर्जाचे अधिकारी असतील. प्रत्येक तपासणी पथकाच्या प्रभारी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी दररोज सकाळी 10 वाजता गेल्या 24 तासांत त्यांच्या पथकांनी केलेल्या कारवाईचा तपशील अद्ययावत करावा लागणार आहे.

दर सोमवारी सकाळी 10 वाजता आठवड्याच्या कामगिरीचा अहवाल परिवहन आयुक्तांना सादर करावा लागणार आहे. तपासणीदरम्यान इंटरसेप्टर वाहनांवर पब्लिक ड्रेस सिस्टीमचा वापर करून त्याद्वारे वाहनचालकांना रहदारीचे नियम पाळण्यासंबंधी वारंवार उद्घोषणासुद्धा केल्या जाणार आहेत. तपासणी मोहिमेवर देखरेख, नियंत्रण व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी रस्ता सुरक्षा कक्षाचे उपपरिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Exit mobile version