टी 20 वर्ल्ड कप पाहण्यासाठी प्रेक्षकांना मिळणार स्टेडियमवर प्रवेश

। मुंबई । वृत्तसंस्था |
यूएई आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबरपासून होणार्‍या टी 20 वर्ल्ड कप पूर्वी एक चांगली बातमी आहे. या स्पर्धेच्या दरम्यान स्टेडियममधील क्षमतेच्या 70 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली आहे. आयसीसी आणि या स्पर्धेचे यजमान असलेल्या बीसीसीआयला यूएई सरकारने ही परवानगी दिली आहे. टी 20 वर्ल्ड कपची सुरुवात 17 ऑक्टोबर रोजी मस्कतमध्ये होणार आहे. तर 14 नोव्हेंबर रोजी दुबईमध्ये फायनल होणार आहे. आयसीसीचे काळजीवाहू सीईओ जेफ अलार्डिस यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, आम्ही ओमान आणि यूएईमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट फॅन्सचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत. क्रिकेट फॅन्सना टी 20 वर्ल्ड कप पाहण्याची संधी मिळणार आहे. आमचे यजमान बीसीसीआय, अमिरात क्रिकेट बोर्ड आणि ओमान क्रिकेट यांच्यासह स्थानिक सरकारचे आभार. त्यांनी फॅन्सना सुरक्षित वातावरणात क्रिकेट पाहता येईल, याची व्यवस्था केली आहे. ते पुढे म्हणाले की, या देशांमध्ये आजवरच्या सर्वात मोठ्या खेळांच्या स्पर्धांचं आयोजन होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणार्‍या सर्व 16 देशांच्या फॅन्सनी याचा आनंद घ्यावा, अशी आमची इच्छा आहे.

तिकीट विक्रीला सुरुवात
आयसीसी टी-20 वर्ल्डकपसाठीच्या तिकीट विक्रीला सुरुवात झाली आहे. यात 17 ऑक्टोबरपासून ते 14 नोव्हेंबरपर्यंत खेळविण्यात येणार्‍या या स्पर्धेचं तिकीट ओमानमध्ये 10 ओमानी रियाल आणि यूएईमध्ये 30 दिरम इतकं असणार आहे.

Exit mobile version