रायगड पोलिसांच्या ताफ्यात ‌‘स्पीड गन’

वाहतूक पोलिसांच्या मदतीला आधुनिक वाहन

| रायगड | प्रमोद जाधव |

रायगड पोलीस दलाच्या हद्दीतील महामार्गासह वेगवेगळ्या मार्गांवर वाहनांची वर्दळ वाढली आहे. मात्र, काही वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवितात. आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आधुनिक यंत्राद्वारे नजर राहणार आहे. रायगड पोलिसांच्या ताफ्यात ‌‘स्पीड गन’ दाखल झाली असून, या आधुनिक वाहनांच्या मदतीने अपघात रोखण्याबरोबरच बेशिस्त चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

रायगड दलाच्या हद्दीत स्वतंत्र जिल्हा वाहतूक शाखा आहे. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याती वाहतुकीवर लक्ष ठेवण्याचे काम केले जाते. जिल्ह्यात 90हून अधिक वाहतूक पोलीस आहेत. वाहतूक पोलिसांच्या मदतीने जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला जात असून, हेल्मेट नसणे, वाहन वेगात चालविणे, ट्रिपल सीट असणे, अशा अनेक प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालक महामार्गासह अन्य मार्गांवरून वाहन चालवितात. आता पोलिसांच्या मदतीला आधुनिक पद्धतीचे वाहन दाखल झाले आहे.

वेगमर्यादचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचे इंटरसेप्टर वाहनांची मदत होणार आहे. मारुती इर्टिगाची कार असून, त्यामध्ये फोर डी रडारगन, ब्रेथ ॲनालायझर, लॅपटॉप, फोल्डींग टेबल, बॅटरी, बॅटरी चार्जिंग केबल, रुफ लाईटबार, पी.ए. सिस्टीम आदी सुविधा असणार आहेत. या वाहनाला असलेल्या कॅमेऱ्याच्या मदतीने प्रत्येक गाडीवर लक्ष ठेवण्याचे काम केले जाणार आहे. मर्यादेपेक्षा वेगात वाहन चालविणाऱ्यांवर आता या स्पीड गनद्वारे नजर ठेवली जाणार आहे. रायगड पोलीस दलाच्या ताफ्यात पहिल्यांदा ही स्पीड गन दाखल झाली असून, या गाडीचा उद्घाटन समारंभ पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला.

रायगड पोलीस दलाच्या हद्दीत महामार्गावर 45 ब्लॅक स्पॉट आहेत. जे वाहन चालक सुसाटपणे वाहने चालवितात, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या स्पीड गनचा उपयोग होणार आहे. अपघात रोखण्यासाठी या गाडीची मदत राहणार आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. रडार, सेंसर अशा अनेक सुविधा स्पीड गनमध्ये आहे. या गाडीमुळे वाहनांची सर्व माहिती एका क्लीकवर समजणार आहे.

अभिजीत भुजबळ,
पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा

Exit mobile version