अलिबाग पोस्टामध्ये पासपोर्ट ऑफिसच्या कामाला वेग

दोन महिन्यात होणार कामकाज सुरु
आ.जयंत पाटील यांनी केली होती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट काढायचा असल्यास, ऑनलाइन प्रक्रिया झाल्यानंतर ठाणे कार्यालय गाठावे लागत असे. रायगडकरांची या त्रासातून सुटका करण्याच्या उद्देशाने आ. जयंत पाटील यांनी अलिबागमध्येच पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे केली होती. सदर मागणीची दखल घेत अलिबाग येथील पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्टचे कार्यालय सुरु होण्यास मंजुरी मिळाली असून त्यादृष्टीने बांधकाम देखील सुरु करण्यात आहे. त्यामुळे पासपोर्ट कार्यालय उभारणीला वेग आला असल्याने आ. जयंत पाटील यांनी समाधान व्यक्त करीत नितीन गडकरी आणि केंद्र सरकारला धन्यवाद दिले आहेत.

रायगड जिल्हा हा फार मोठा आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील दुर्गम भागातून येणार्‍या स्थानिकांना ठाणे येथे जाऊन पासपोर्ट संबंधित कामे करताना फार त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे हे शहर रायगड जिल्हयाचे केंद्र स्थान असल्याने या ठिकाणी पासपोर्ट कार्यालय सुरु झाल्यास जिल्हयातील लोकांची होणारी हेळसांड थांबावी व त्यांना पासपोर्ट संदर्भातील आपली कामे सुलभरित्या पार पाडता यावीत, या उद्देशाने आ. जयंत पाटील यांनी नितीन गडकरी यांच्याकडे अलिबागमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याची मागणी केली होती.

रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील पासपोर्ट काढण्यासाठी ठाणे हे एकमेव कार्यालय आहे. यामुळे पोलादपूरच्या टोकापासून ते अलिबागच्या नागरिकांना पासपोर्ट काढण्याच्या प्रक्रियेसाठी बरीच धावपळ करावी लागते. काही त्रुटी निघाल्यास पुन्हा ठाण्याला जाण्याची वेळ येते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय थांबावी, या उद्देशाने आ. जयंत पाटील यांनी हा प्रश्‍न उचलून धरला. त्यांच्या मागणीची दखल घेत सदर कार्यालय अलिबागमध्ये मंजुरी मिळाली असून त्यादृष्टीने अलिबाग येथील पोस्टाच्या इमारतीत विस्तारीकरणास सुरुवात झाली असून कामाला वेग आला आहे. आवश्यक त्या दुुरुस्ती झाल्यानंतर दोन महिन्यात सदर कार्यालय सुरु होणार असल्याची माहिती पोस्ट ऑफिसच्या सुत्रांनी दिली.

Exit mobile version