कर्जत तालुक्यात भातलावणीला वेग

Oplus_131072

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यात भाताच्या लावणीला सुरुवात झाली असून मजुरांचा अभाव असताना देखील शेतीची मशागत करण्यास शेतकरी गुंतले आहेत. त्यात पावसाची सुरू असलेली उघडीप यामुळे देखील शेतीची कामे वेगाने सुरू आहेत.

कर्जत तालुका हा कृषी प्रधान तालुका असून या तालुक्यात भाताची शेती खरीप हंगामात केली जाते. या तालुक्यातील दहा हजार हेक्टर जमिनीवर भाताची शेती केली जाते. त्यासाठी शेतकर्‍यांनी जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा अंदाज बघून भाताची रोपे यांची लागवड केली होती. त्यानुसार जुलै महिना सुरू झाल्यानंतर भाताच्या रोपांची वाढ लक्षात घेवून शेतकर्‍यांनी भाताची लावणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यात डोंगर रांगेत असलेल्या गावातील शेतकर्‍यांनी भाताची लावणी पूर्ण देखील केली आहे. गतवर्षी जून महिन्यात सुरुवात दणक्यात केल्यानंतर पुढे पावसाने थेट विश्रांती घेतली होती. त्यानंतर भाताची रोपे पुन्हा जगविण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन करावे लागले होते. गतवर्षी जास्त पावसाने भाताची रोपे फुकट केली होती आणि त्यावेळी दुबार भाताची रोपे शेतकर्‍यांना आपल्या शेतात टाकावी लागली होती. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने भाताची रोपे आजपर्यंत सुस्थितीत असून भाताच्या रोपांची वाढ देखील समाधानकारक पाऊस यामुळे झाली आहे. त्यामुळे तालुक्यात बहुसंख्य ठिकाणी भाताची लावणी शेतकर्‍यांनी सुरू केली आहे. त्यात मोठे जमीन क्षेत्र असलेले शेतकरी यांनी यांत्रिकीकरण यांची जोड शेतीच्या कामाला दिली असल्याचे दिसून येत आहे. कर्जत तालुक्यात सध्या भात लावणीचा हंगाम सुरू असून, शेतकरी भाताच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

आमच्याकडे सातत्याने मजूर घरच्यासारखे काम करीत असतात. त्यामुळे आम्हाला मजुरांची कोणतीही अडचण भासत नाही. शेतीच्या कामासाठी चांगला पाऊस पडत आहे, पण लावणी केलेल्या भाताच्या पिकावर रोगराई पसरू नये यासाठी पावसाची दमदार हजेरी आवश्यक आहे. एक चांगला पूर गरजेचा असून, त्याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागून राहिले आहेत.

मोहन शिंगटे,
शेतकरी पाथरज

आमच्या शेतकर्‍यांच्या मजुराचा प्रश्‍न मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे वाढला आहे. सर्व भगिनी या योजनेत नावनोंदणी करण्यासाठी दररोज घराबाहेर पडत असल्याने महिला या शेताच्या कामासाठी मिळत नाहीत.

सुनील घोडविंदे,
शेतकरी तळवडे
Exit mobile version