| पुणे | प्रतिनिधी |
पुण्यातल्या येरवड्यामध्ये भरधाव कारने दुचाकीला चिरडलं. या अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली. तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. बहिणीला कॉलेजमध्ये सोडायला जात असताना हा भयंकर अपघात झाला. या अपघातामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येरवड्यातील लक्ष्मी नगरमध्ये राहणाऱ्या अजिंक्य राजू गायकवाड (22) याचा अपघातामध्ये मृत्यू झाला. तर त्याची बहीण अनुष्का गायकवाड ही अपघातामध्ये गंभीर जखमी झाली. सोमवारी (दि.4) सकाळी अजिंक्य आपल्या लाडक्या बहिणीला कॉलेजमध्ये सोडण्यासाठी जात होता. वाटेमध्ये अनर्थ घडला. त्यांच्या दुचाकीला भरधाव कारने धडक दिली. या अपघातामध्ये दोघे गंभीर जखमी झाले. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे अजिंक्यचा जागीच मृत्यू झाला. तर अनुष्काला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. अपघातामध्ये दुचाकीचा चक्काचूर झाला. अनुष्काची सध्या मृत्यूशी झुंज सुरू आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या अनुष्काला पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती चिंताजनक आहे. तर मृत्यू झालेल्या अजिंक्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह कुटंबीयांकडे सोपवण्यात आला. या अपघातामुळे अजिंक्यच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या प्रकरणी पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.







