। ठाणे । प्रतिनिधी ।
मुंब्रा येथे गावदेवी बायपासजवळ दुचाकी आणि कंटेनरचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथील गावदेवी बायपास येथे कंटेनरला अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार कंटेनरखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पथक दाखल होत पंचनामा सुरु केला. स्थानिकांनी सांगितल्यानुसार, आपल्या दुचाकीवरुन ही मुले कामानिमित्त बाहेर चालली होती. अशातच कंटेनरच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना देताच मुंब्रा पोलीस स्टेशन, मुंब्रा फायर ब्रिगेड व आपत्ती व्यवस्थापन कक्ष व ॲम्बुलन्स यांना त्वरीत बोलून मदत कार्य सुरू केले. तथापि पोलीस तपासणीत अपघातातील तिन्ही मृत मुलं 18 ते 23 वयोगटातील असून, अफजल मोईनुद्दीन हसन हा दुचाकीस्वार होता. हे तरुण दुचाकीने ठाणे शिळफाटा मार्गाने जात असताना ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी नजीकच्या सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.







