| महाड | प्रतिनिधी |
महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील दहिवाड परिसरात भरधाव वेगातील ऑटो रिक्षा पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालक सुजित सुधीर सकपाळ (25), रा. साकडी-कुसगाव यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
कर्ण रिसॉर्ट परिसरातून दहिवाड गावाच्या दिशेने जात असताना रिक्षा चालकाने वाहनावरील नियंत्रण गमावल्याने रिक्षा पलटी झाली. प्राथमिक माहितीनुसार, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अति वेगाने वाहन चालविल्यामुळे हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातात रिक्षाचेही मोठे नुकसान झाले. जखमींमध्ये फिर्यादीसह अनिकेत शशिकांत धयाळकर (24), रोहिणी हिरामण धयाळकर आणि अंतरा शशिकांत धयाळकर (रा. नांदगाव, ता. महाड) यांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महाड एमआयडीसी पोलीस करीत आहेत.






