। चंद्रपूर । प्रतिनिधी ।
राजुरा तालुक्यातील कापणगाव येथे ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षामधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. प्रकाश मेश्राम (48) रिक्षा चालक, रवींद्र बोबडे (48), शंकर पिपरे (50) आणि वर्षा मांदाडे (50) अशी मृतांची नावे आहेत. तर गंभीर जखमी असलेल्या तिघांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. एक प्रवासी किरकोळ जखमी असून, त्याच्यावर राजुरा येथे उपचार सुरू आहेत. ट्रक हा राजुऱ्याकडून खामोना-पाचगाव येथे जात होता, तर रिक्षा गडचांदूर येथून राजुऱ्याकडे येत होती. कापणगाव येथे सर्विस रोड वरून हायवे वर रिक्षा येताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. यामध्ये रिक्षा चालक प्रकाश मेश्राम याच्यासह तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
भरधाव ट्रकची रिक्षाला धडक; चौघांचा जागीच मृत्यू
