राष्ट्रीय अध्यक्ष आ. रमेश पाटील यांचे प्रतिपादन
| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
कोळी महासंघाच्या नावाने संपूर्ण कोळी समाज एकवटला पाहिजे. एकत्र आलो तर आपली ताकद वाढणार असून, स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे ही काळाची गरज आहे. कोळी महासंघ राज्यातील सर्व कोळी समाज घटकांना एकत्र करून राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी सज्ज होत असल्याचे कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांनी राज्यातील दीड हजार पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेताना प्रतिपादन केले.
लोणावळा येथे दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. राज्याच्या 30 जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांसह तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांना आणि राज्याच्या महसूल विभागाप्रमाणे वर्गवारी करून पाच विभागातील संपर्कप्रमुख आणि लोकसभा, विधानसभा अध्यक्षांच्या नियुक्ती आणि कार्याचा आढावा घेण्यासाठी लोणावळा येथे दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळा यशस्वी पूर्ण झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या बळावर आपण येत्या सहा महिन्यांत कोळी समाजाचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी आराखडा निश्चित करणार असल्याचे प्रतिपादन आ. पाटील यांनी केले.
यावेळी कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, सरचिटणीस राजहंस टपके, उपनेते देवानंद भोईर, युवा प्रदेशाध्यक्ष ॲड.चेतन पाटील, अरुण लोणारे, प्रा. सुरेश पाटकर, शिवशंकर फुले, सतीश धडे, प्रा. अभय पाटील, रामभाऊ कोळी, रामदास कोळी आदी उपस्थित होते.