उरण, द्रोणागिरी, न्हावा शेवा व राजणपाडा रेल्वे स्थानकांचे काम निकृष्ट दर्जाचे
| उरण | वार्ताहर |
नवी मुंबई शहराला जोडणार्या खारकोपर ते उरण अशा रेल्वे मार्गाची उभारणी ही सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च करून रेल्वे व सिडकोच्या माध्यमातून करण्यात आली आहे. परंतु, या रेल्वे मार्गावरील उरण, द्रोणागिरी, न्हावा शेवा व रांजणपाडा या चार रेल्वे स्थानकांचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने पावसाळ्यात गळती लागल्याने प्रवाशांवर जलाभिषेक होत आहे. तसेच फरशीवर पाय घसरून एखाद्याला दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी, सदर कामांची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर उरण हा विकसनशील तालुका आहे. उरण तालुक्याला प्रवासी रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी रेल्वे व सिडको प्रशासनाने सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च करून खार कोपर ते उरण अशा प्रकारचा प्रवाशी रेल्वे प्रकल्प हाती घेतला. या प्रवासी रेल्वे प्रकल्पात उरण, द्रोणागिरी, न्हावा शेवा, रांजणपाडा व गव्हाण ही महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. त्यातील गव्हाण रेल्वे स्थानकांचे काम अपूर्ण असून, उर्वरित चार रेल्वे स्थानकांची कामे मार्गी लागली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात खार कोपर ते उरण या प्रवासी रेल्वे प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मार्च 2024 मध्ये पार पडला. मात्र, घाईगडबडीत उरकण्यात आलेल्या उरण, द्रोणागिरी, न्हावा शेवा व राजणपाडा या चार रेल्वे स्थानकांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने सध्या बांधकाम ढासळू लागून फरशा उखडत असून, आरसीसीच्या स्लॅबला, पत्रा शेडला पाण्याची गळती लागली आहे. पावसाळ्यातील पाणी फरशांवर पसरत असल्याने पाय घसरून एखाद्याला दुखापत होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. त्यात स्थानक परिसराची, शौचालयाची स्वच्छता वेळच्या वेळी होत नसल्याने सदर रेल्वे स्थानकांना बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.
उरणकरांना सुखद रेल्वे प्रवास व्हावा यासाठी गेली 50 वर्षे वाट पाहावी लागली आहे. परंतु, रेल्वे व सिडको प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे व भ्रष्ट कारभारामुळे आज उरणच्या रेल्वे स्थानकाच्या अंडरग्राऊंडमध्ये पावसाचे पाणी साचते, तसेच उरण, द्रोणागिरी, न्हावा शेवा व राजणपाडा रेल्वे स्थानकांची अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे झाली असून, पावसाळ्यात गळती लागली आहे. तरी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदर भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी.
– प्रगती पाटील, एक प्रवासी
उरण तालुक्यातील प्रवासी रेल्वे स्थानकांची कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत. तसेच या परिसरातील स्वच्छता करण्यासाठी आजतागायत कामगारांची नियुक्ती न केल्याने स्थानकात घाणीचे साम्राज्य पसरत आहे.
– बळराम मिना, रेल्वे स्थानक व्यवस्थापन अधिकारी