| म्हसळा | वार्ताहर |
शालेय जीवनातील श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून शिस्त, चिकाटी व नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. दुसर्यांना मदत करण्याची जाणीव होत असते, त्याचबरोबर श्रमसंस्कार शिबिरातून आत्मिक समाधान मिळत असते, असे मत पोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे यांनी व्यक्त केले.
म्हसळा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेजचे म्हसळा आदिवासीवाडी येथे दि. 6 ते 12 जानेवारीपर्यंत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे (एनएसएस) आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 6) पोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संदीपान सोनावणे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी जास्तीच जास्त स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजेत. आगामी काळात चांगला अभ्यास करून प्रशासकीय कामात येणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील गरीब घरातूनच अनेक प्रशासकीय अधिकारी तयार होत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वेगळीच ऊर्जा असते तसेच त्यांना आईवडिलांच्या कष्टाची जाणीव असते. प्रशासकीय कामातून सामाजिक काम करण्याचा आनंद मिळतो.
स्कुल चेअरमन समीर बनकर यांनी विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार शिबिराबाबत शुभेच्छा देऊन शालेय जीवनातील येणारे अनुभव सोबत ठेवून उद्याचे भविष्यात येणार्या अडीअडचणी बाबतीत मार्गदर्शन केले. प्रा. प्रकाश हाके यांनीही श्रमसंस्कार शिबिराचे महत्त्व विशद करून सांगितले. तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे, चेअरमन समीर बनकर, नगरसेवक अनिकेत पानसरे, प्राचार्य प्रकाश हाके, एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. शेख, प्रेस क्लब अध्यक्ष शशिकांत शिर्के, जेष्ठ पत्रकार उदय कळस, पत्रकार सुशील यादव, प्रा. विनयकुमार सोनावणे, गाव प्रमुख वसंत जाधव, मराठी शाळा मुख्याध्यापक राव सर, सहायक कार्यक्रम अधिकारी श्रीमती व्ही. खुताडे यांसह विद्यार्थी उपस्थित होते.