स्वच्छतेविषयक संदेशांसाठी रंगांची उधळण

| पनवेल | वार्ताहर |
पनवेल पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने पालिका क्षेत्रातील मुख्य मार्गांवरील दर्शनी असलेल्या भिंतींवर स्वच्छताविषयक संदेशांमधून जनजागृती केली जात आहे. विविध कलाकृतींमुळे शहराच्या सौंदर्यात भर घालणार्‍या भिंती बोलक्या झाल्याचा भास होत आहे. स्वच्छ भारत अभियानामध्ये स्वच्छताविषयक सर्वेक्षणाअंतर्गत पनवेल महापालिकेला गौरवण्यात आले आहे.

देशभरातील निवडलेल्या शहरांमध्ये पनवेल शहराचादेखील समावेश असल्यामुळे चमकदार कामगिरीसाठी पनवेल महापालिकेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. याच अंतर्गत शहरातील भिंती रंगवून संदेशांमधून जनजागृती केली जात आहे. या चित्रांमध्ये देशाच्या सैन्य दलाविषयीची माहिती तसेच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व रेखाटण्यात आले आहे. त्यामुळे विविध रंगाच्या माध्यमातून निर्जीव असलेल्या भिंती बोलक्या झाल्याचा भास पनवेलकरांना होत आहे. शहरातील बसथांबे, बसस्थानके, उड्डाणपुलाखाली साकारलेल्या विविध कलाकृतींमुळे सौंदर्यात भर घातली आहे.

पावसाळ्यातही हे रंग उठून दिसतील, असा प्रयत्न आहे. दोन महिन्यात हे काम पूर्ण केले जाणार असून मुख्य मार्गातील दुभाजकांमध्ये सुशोभित झाडेदेखील लावली जाणार आहेत. – सचिन पवार, उपायुक्त, पनवेल महापालिका

Exit mobile version