आबालवृद्धांनी लुटला धुळीवंदनाचा आनंद
। अलिबाग । प्रतिनिधी ।
होळी दहनानंतर रायगड जिल्ह्यामध्ये सोमवारी (दि.25) मार्च रोजी धुळीवंदनानिमित्त रंगांची उधळण करण्यात आली. शहरी भागासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. आबालवृद्धांपासून सर्वांनीच या उत्सवाचा आनंद मनमुरादपणे लुटला.
रायगड जिल्ह्यामध्ये 24 मार्च रोजी होलिकोत्सव साजरा करण्यात आला. पूरणपोळीचा नैवेद्य दाखवित होळीची मनोभावे पूजा करण्यात आली. त्यानंतर रात्री होळीचे दहन करीत बोंब मारण्यात आली. दुसर्या दिवशी सोमवारी धुळीवंदननिमित्त अनेकांनी रंगाची उधळण केली. एकमेकांच्या अंगावर रंग उडवून हा उत्सव साजरा केला. गावांमध्ये पारंपरिक सवाद्य मिरवणुका काढण्यात आल्या. यावेळी पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण करीत होळी रे होळी… पुरणाची पोळी… अशी आरोळी ठोकण्यात आली. विशेष म्हणजे, मोबाईलमध्ये मग्न असणारी बच्चेकंपनी व तरुणाई यावेळी स्वखुशीने या उत्सवात सहभागी झाल्याचे दिसून आहे. ढोलताशा, खालूबाजा तालावर यावेळी नाचगाणी करण्यात आली. दरम्यान, एकमेकांच्या अंगावर पाणी उडविण्याबरोबरच रंगांची उधळण करण्यात येत होती. यावेळी जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण होते. दरम्यान, पर्यावरणपूरक रंगांना तरुणाईने अधिक पसंती दिल्याचे दिसून आले.