नागांवमध्ये नेत्र तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने मोफत चष्मे

। अलिबाग । प्रतिनिधी ।

ग्रामपंचायत नागांव, लायन्स क्लब ऑफ अलिबाग-नागांव, डॉ. वर्षा नाईक, निखिल मयेकर मित्रमंडळ यांच्या वतीने नागांव येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिराला सकाळी नऊ वाजल्यापासून सुरुवात झाली. नेत्र तपासणीला नागावकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागांवमधील 230 नागरिकांना शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते मोफत चष्मे वितरीत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य प्रियदर्शनी पाटील, माजी सरपंच नंदकुमार मयेकर, निखिल मयेकर, हर्षदा मयकेर, राजेंद्र मयेकर, नितीन पाडेकर, सचिन राऊळ, सुरेंद्र नागलेकर, प्रियांका काठे, मीना म्हात्रे, लायन्स क्लबचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

गोरगरीबांसाठी काम करण्याचे ध्येयः चित्रलेखा पाटील
नारायण नागू पाटील, प्रभाकर पाटील, दत्ता पाटील या नेते मंडळींनी तळागाळातील घटकाला उभारी देण्याचे काम आपापल्या परीने केले आहे. शेतकरी, शिक्षक, कामगार अशा अनेक घटकाला न्याय देण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. त्यांचा हा वारसा पुढे नेऊन गोरगरीबांसाठी काम करण्याचे ध्येय ठेवले आहे. सामाजिक बांधिलकी जपत शाळकरी मुलींना सायकली वाटप केल्या असून, मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम ‌‘प्रोजेक्ट दृष्टी’ उपक्रमातून सुरु केला आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा आनंद मिळत आहे, असे प्रतिपादन शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सोमवारी केले.

त्या पुढे म्हणाल्या की, वयाच्या चाळिशीनंतर ग्रामीण भागात डोळ्यांच्या किरकोळ आजाराकडे दुर्लक्ष केले जाते. डोळे महत्त्वाचे आहेत. डोळ्यांची निगा प्रत्येकाने राखली पाहिजे. डोळ्यांच्या आजारावर वेळेवर उपचार करणेही गरजेचे आहे. मात्र, ग्रामीण भागात आर्थिक परिस्थितीबरोबरच नियमित डोळ्यांच्या आजारावर उपचार केले जात नसल्याने डोळ्यांच्या आजाराला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पाटील यांचा समाजसेवेचा वसा घेत गोरगरीबांना मोफत चष्मे वाटप करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. तीन लाख नागरिकांना मोफत चष्मे देण्याचा मानस आहे. आतापर्यंत वीस हजारांपेक्षा अधिक नागरिकांना चष्मे दिले आहेत. दृष्टी नावाचा हा उपक्रम हाती घेतला आहे. डोळ्यांच्या तपासणीबरोबरच मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करून अनेकांना आधार देण्याचे काम केले आहे. यामध्ये गावागावातील शेकाप कार्यकर्ते, लायन्स क्लब, लायन्स हेल्थ फाऊंडेशन, जिल्हा सामान्य रुग्णालय अशा अनेक संस्था, संघटनांचा सहभाग राहिला आहे. माणुसकीचा हाच खरा धर्म असा वसा घेत सुरु केलेले सामाजिक काम चांगल्या पद्धतीने गावागावात होत आहे, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

पाल्हेमध्ये शंभरहून अधिक जणांना चष्मे
अलिबाग तालुक्यातील पाल्हे येथील रखुमाई मंदिरात ग्रामपंचायत नागांव, लायन्स क्लब ऑफ अलिबाग-नागाव, डॉ. वर्षा नाईक, निखिल मयेकर मित्रमंडळ यांच्या वतीने नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन नागावच्या माजी सदस्य हर्षदा मयेकर, रसिका प्रधान, राजेंद्र मयेकर, सुरेंद्र नागवेकर, डॉ. गणेश गवळी, डॉ. प्रमोद खानावकर, जनार्दन गुरव आदी मान्यवरांसह पाल्हे येथील ग्रामस्थ, महिला व लाभार्थी उपस्थित होते. शिबीरात सहभाग घेणाऱ्यांची नेत्र तपासणी केली. त्यानंतर त्यांच्या डोळ्यांच्या आजारानुसार चष्मे वाटप करण्यात आली. शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नाने मोफत चष्मे देण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
Exit mobile version