शेकापच्या लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

दुसर्‍या टप्प्याच्या पहिल्या दिवशी 200 लाभार्थ्यांचे लसीकरण
। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील प्रयत्नाने बुधवार दि. 15 सप्टेंबर रोजी वरसोली आणि थळ कोळीवाडा येथील 200 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन चित्रलेखा पाटील यांचे आभार मानले.
शेतकरी कामगार पक्षाने दि. 1 ते 8 सप्टेंबर रोजी मोफत लसीकरण मोहिमेस सुरुवात केली. यावेळी शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी अत्यंत चोख नियोजन करुन लसीकरणाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पाडला. याच पार्श्‍वभूमीवर बुधवारी (दि. 15) मोफत लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला. शेकापतर्फे तोडकरी रुग्णालयात नागरिकांना मोफत लसीकरण करण्यात आले.
ऑफलाईन पद्धतीची असणारी ही लसीकरण मोहिम गावपातळीनुसार सुरु करण्यात आली होती. दुसर्‍या टप्प्याचेही योग्य नियोजन करण्यात आले आहे. कोरोना नियमांचे पालन करुन नागरिकांनी लस घेतली. या मोहिमे अंतर्गत रोज एक किंवा दोन गाव असे 200 लोकांना लस देण्यात येणार आहे. गुरुवारी (दि.16) वेश्‍वी व गोंधळपाडा येथील नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल. यापुढे तिसर्‍या व चौथ्या टप्प्याचेही नियोजन करण्यात येणार असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version