। नागोठणे । महेश पवार ।
रोहा येथील कनिष्ठ स्तर दिवाणी व फौजदारी न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या दिवाणी व फौजदारी प्रलंबित असलेल्या एकूण 3624 खटल्यांपैकी 2423 खटल्यांतून 1058 खटले तडजोडीने निकालात काढण्यात आले. यामधून 93 लाख 62 हजार, 315 रुपये एवढी रक्कम तडजोडीअंती जमा झाली. तसेच कौंटुबिक हिंसाचार कायद्यांतर्गत असलेल्या एक प्रकरणातील अर्जदार महिला नांदण्यास गेल्याने एक संसार पुन्हा जुळण्यास या लोक न्यायालयात यश आले.
रोहा न्यायालयातील या लोक अदालतीमध्ये प्रकरणे ठेवून ती तडजोडीने मिटविण्याचे आवाहन पक्षकारांना करण्यात आले होते. त्यास पक्षकारांनी चांगला प्रतिसाद दिला. या लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या दाखल प्रकरणातील एकूण 1695 पैकी 494 प्रकरणांतून 182 प्रकरणे तडजोडीने निकाली काढून त्यामधून एकूण 13 लाख, 74 हँजार, 309 रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच दाखलपूर्व वाद खटले म्हणजेच रोहा नगरपरिषद, तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी, राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था, बीएसएनएल, एमएसईबी यांच्याकडील एकत्रित 1929 प्रकरणे तडजोडीकरिता लोकन्यायालयात ठेवण्यात आली होती. त्यापैकी 876 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात येवून त्यामधून 79 लाख, 88 हजार, 06 रुपये रक्कम वसूल करण्यात आली. त्यामुळेच रोहातील लोक अदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पहावयास मिळाले.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई., जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अलिबाग-रायगड यांच्या निर्देशानुसार रोहा तालुका विधी सेवा समिती मार्फत राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन रोहा येथील कनिष्ठ स्तर दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी (दि. 14) करण्यात आले होते. या लोकअदालतीचे उद्घाटन रोहा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एस.एस.महाले यांच्या हस्ते व सह न्यायाधीश श्रीमती एम.सी. हासगे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. रोह्यातील या लोकन्यायालयात कक्षप्रमुख म्हणून तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी व फौजदारी न्यायाधीश एस.एस.महाले यांनी काम पाहिले. तर यावेळी पंच म्हणून अॅड. ओमकार शिलधनकर यांनी काम पाहिले.