‘यादों की बारात’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जेएसएम व अ‍ॅड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबागमधील जे. एस. एम कॉलेज व अ‍ॅड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ च्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन रविवारी (दि.05) महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. यादो की बारात पर्व दुसरे या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाली असून प्रेक्षकांकडूनदेखील चांगली दाद मिळाली.

जे. एस. एम. कॉलेज अ‍ॅल्युमनी असोसिएशन आणि अ‍ॅड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ अ‍ॅल्युमनी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. स्नेहमेळाव्याच्या उद्घाटन अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रशांत नाईक यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी समारंभाचे अध्यक्ष म्हणून जनता शिक्षम मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील उपस्थित होते.

यावेळी जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ. साक्षी पाटील, सेक्रेटरी गौरव पाटील, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अनिल पाटील, अ‍ॅड. स्वप्नील पाटील, अ‍ॅड. महेश पटेल, जेएसएम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, अ‍ॅड. दत्ता पाटील लॉ कॉलेजच्या प्राचार्या अ‍ॅड. निलम हजारे आदी मान्यवरांसह जेएसएम व लॉ कॉलेजचे माजी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

’यादों की बारात-पर्व 2’ या नावाने आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचा सुवर्णयोग जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील यांच्या पुढाकाराने जुळून आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, प्राचार्य अ‍ॅड. नीलम हजारे यांनी दोन्ही महाविद्यालयांच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अ‍ॅड. गौतम पाटील यांनी स्व. नानासाहेब कुंटे, अ‍ॅड. दत्ता पाटील यांनी हे कॉलेज नावारुपास आणण्याकरिता केलेल्या कार्याची माहिती दिली. आगामी विकास योजनांची माहिती उपस्थितांना देत महाविद्यालयाच्या विकासात हातभार लावण्याचे आवाहन माजी विद्यार्थ्यांना केले. याप्रसंगी कला क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सचिन कांबळे यांचा अ‍ॅड गौतम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी जनता शिक्षण मंडळाच्या संचालक शैला पाटील यांसह संचालक मंडळाचे सदस्य व विविध ठिकाणाहून आलेले 200 माजी वद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रांगणात जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी ‘खेळ पैठणीचा’ व संगीत खुर्ची अशा मनोरंजक खेळांचे आयोजनही करण्यात आले. अनेक माजी विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य, अभिनयाचा आविष्कार घडविणारे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. स्ट्रिंग्स फॅमिली, अलिबाग यांच्या ‘म्युझिकल शो’ने कार्यक्रमात रंगत आणली.

Exit mobile version