। अलिबाग । प्रतिनिधी ।
‘एनसीडीसी’चे लक्ष्मणराव इनामदार ‘नॅशनल अकॅडमी फॉर को-ऑपरेटिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र’ आणि केंद्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मच्छिमारांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. अलिबागमधील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत आयोजित या कार्यशाळेच्या प्रशिक्षणा दरम्यान वात्सल्य ट्रस्टच्या उपप्रकल्प प्रमुख वरदा मेहेंदळे, मत्स्य व्यवसाय विभाग रायगडचे सहाय्यक आयुक्त संजय पाटील, (दुग्ध) सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक राजेंद्र मरकड, अक्रिष्टा रितू आदी मान्यवरांसह जिल्ह्यातील मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहकाराचे महत्त्व, महिलांचा मत्स्यव्यवसायातील महत्त्वपूर्ण सहभाग याबद्दल आपले मत व्यक्त करीत वरदा मेहेंदळे पुढे म्हणाल्या, गुणवत्ता पूर्ण बीज निर्मिती, बीज संकलन त्याची उपलब्धता मत्स्य व्यवसायातील यशाचा गाभा आहे. मच्छिमार बांधवांनी कोल्ड स्टोरेज, मत्स्य विपणन, माशांची बाजारपेठेतील उपलब्धता या बाबीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मत्स्यव्यसायात महिलांचे प्रमाण अत्यल्प असून महिलांनी एकत्र येऊन मत्स्य सहकारी संस्था स्थापन करायला हव्यात असे त्यांनी सांगितले.
जिल्हा मच्छिमार मध्यवर्ती सहकारी संघाचे समन्वयक, अमोद साळगावकर यांनी अनुदानाचे प्रस्ताव जलद संघांकडे सादर करावे असा आग्रह केला. जेणेकरून ते प्रस्ताव एनसीडीसीला सादर करून मच्छिमार संघांना, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने अंतर्गत मिळणार्या अनुदानाचा लाभ घेता येईल आणि संघांचे सशक्तीकरण करण्यास मदत होईल असेही ते म्हणाले. यावेळी संजय पाटील, रविंद्र मरकड आदी मान्यवरांनी किसान क्रेडिट कार्ड, अपघात गटविमा, पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत येणार्या विविध राज्य शासनाच्या योजनांची माहिती दिली. मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थांसाठी असलेल्या योजनांसाठी प्रस्ताव तयार करण्याबाबत सुरभी मेश्राम, एनसीडीसी प्रोग्राम ऑफिसर यांनी मार्गदर्शन केले. अक्रिष्टा रितू यांनी प्रास्तावना करून मान्यवरांचे स्वागत केले.





