खाद्य पदार्थांसह वेगवेगळ्या वस्तू विक्रीची दुकाने गजबजली
अलिबाग | प्रतिनिधी |
कार्तिक वैद्य एकादशी पासून अमावस्येपर्यंत पाच दिवस भरणाऱ्या विठोबाच्या यात्रेला गेल्या दोन दिवसांपासून भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अलिबागसह जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील भाविक दर्शनासाठी येत आहेत. यात्रेसाठी साडेचारशेहून अधिक थाटलेल्या दुकानांमध्ये खरेदीला प्रचंड गर्दी दिसून येत आहे.
अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील विठोबाची यात्रा शुक्रवारपासून सुरु झाली आहे. साजगावच्या बोंबल्या विठोबाच्या यात्रेनंतर रायगड जिल्ह्यातील ही दुसऱ्या क्रमांकाची यात्रा आहे. या यात्रेला 183 वर्षाची परंपरा आहे. यात्रेनिमित्ताने मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पाच दिवस मंदिर परिसरात विठुनामाचा गजर ऐकावयास मिळत आहे. विठ्ठल मंदिर परिसरासह अलिबाग -वरसोली रस्त्याकडेला रामनाथ कुंभारआळीत वेगवेगळ्या प्रकारची दुकाने थाटली आहेत.
वेगवेगळ्या प्रकारची खेळणी, कपडे, खेळाचे साहित्य, विद्युत वस्तू तसेच मिठाईच्या दुकानांनी यात्रा फुलून गेली आहे. दर्शनासाठी भाविकांची सकाळपासून गर्दी होत आहे.