महाडमध्ये तुरळक पाऊस

| महाड | प्रतिनिधी |

तालुक्यात काही ठिकाणी मंगळवारी पहाटेपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणामध्ये पूर्णतः बदल झाला आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, दैनंदिन कामकाजामध्ये त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र, आंबा बागायतदार आणि वीटभट्टी व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

महाड तालुक्यातील ग्रामीण तसेच औद्योगिक परिसरात काही ठिकाणी पहाटेपासून हलक्या स्वरूपात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे वातावरणात काहीसा बदल झाला असून, गारवा निर्माण झालेला आहे. अचानक पाऊस आल्यामुळे वीटभट्टी उत्पादक तसेच बागायतदारांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील बागायतदार महेश शिंदे यांनी पावसाबद्दल चिंता व्यक्त केली. पावसाचे प्रमाण कमी असल्याने या पावसाचा परिणाम आंब्याच्या मोहरावर होणार नाही, त्याचबरोबर वीटभट्टी कारखान्यांवरदेखील होणार नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, कडधान्याच्या रोपावर होऊन बुरशी येण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर ढगाळ वातावरण असल्यामुळे आंबा उत्पादक, वीट कारखानदारांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

पावसामुळे शहरातील बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला आहे. दररोज ग्राहकांनी भरलेली बाजारपेठ आज पूर्णपणे शांत असल्याचे दिसत होते. महाडनजीक असलेल्या काही गावांतून त्याचबरोबर औद्योगिक वसाहतीमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र, कोणत्याही स्वरूपाचे नुकसान झाले नसल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

Exit mobile version