| कोलाड | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील ज्ञानांकुर इंग्रजी माध्यम शाळा खांब येथे तीन दिवसीय क्रीडा महोत्सव उत्साही वातावरणात संपन्न झाला. पारंपारिक स्नेहसंमेलन व सहलीपेक्षा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला अधिक प्रभावी ठरणाऱ्या क्रीडा संस्कारांना प्राधान्य देण्याचा ठाम निर्णय शाळेने घेतला. त्यामुळे या निर्णयाला पालक, शिक्षक, तसेच विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
आधुनिक काळात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान उपयुक्त नाही. तर, विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या सक्षम, मानसिक दृष्ट्या सशक्त आणि नैतिक दृष्ट्या सजग असणे आवश्यक आहे. खेळ विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि नेतृत्व गुण देतो. स्पर्धेतील अपयश हे निराशेचे कारण नसून पुढील यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल या उद्देशाने क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन कोलाड पोलीस निरीक्षक निलेश महाडिक, उपनिरीक्षक नरेश पाटील, लायन्स क्लबचे आर.पी. पांडे, रायगड जिल्हा कबड्डी सदस्य जनार्दन पाटील, निवृत्त शिक्षक धनवी, तळवली सरपंच रविंद्र मरवडे, खांब सरपंच सुरेखा पार्टे, उपसरपंच संतोष टवले यांच्या उपस्थित झाले. या सर्व क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. रविंद्र लोखंडे, मुख्यध्यापिका रिया लोखंडे, शारीरिक शिक्षक ज्ञानेश्वर महाडिक व निलेश टवले यांनी मोलाची भूमिका बजावली.







